बदलापूर, टिटवाळा, कल्याण येथून १३ नव्या सेवा
उपनगरीय रेल्वे मार्गावरील प्रचंड गर्दीला दिलासा देण्यासाठी मध्य रेल्वेने १५ मार्चपासून मुख्य मार्गावर १३ नव्या सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कळवा, मुंब्रा, दिवा या स्थानकांवरील प्रवाशांचा विचार करून मध्य रेल्वेने यापैकी बहुतांश सेवा ठाण्यापल्याडच चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
नव्या सेवांमध्ये सकाळी गर्दीच्या वेळी बदलापूर, टिटवाळा आणि कल्याण येथून ठाण्यासाठी एक सेवा चालवण्यात येणार आहे. तसेच संध्याकाळी गर्दीच्या वेळीही ठाण्याहून या तीन ठिकाणांसाठी एक एक सेवा चालवण्यात येईल. त्याशिवाय सकाळच्या वेळी टिटवाळा आणि आसनगाव यांदरम्यानच्या कंपन्यांमधील कामगारांसाठी टिटवाळ्याहून आसनगाव लोकल चालवण्यात येणार आहे. तसेच दिवसभरात कल्याणहून कुल्र्यासाठी दोन नव्या सेवा, कुल्र्याहून कल्याणसाठी दोन नव्या सेवा चालवण्यात येतील. तसेच विद्याविहारहून कल्याणपर्यंतही दोन नव्या सेवा चालवण्यात येणार आहेत. या सेवांचा फायदा घाटकोपर येथे वाढलेल्या प्रवासी संख्येला होणार आहे. या १३ नव्या फेऱ्यांशिवाय मध्य रेल्वेने आपल्या सध्याच्या दोन फेऱ्यांचे विस्तारीकरण केले आहे. सध्या आसनगावहून ठाण्यापर्यंत चालणारी एक सेवा कुल्र्यापर्यंत चालवली जाईल. कुर्ला-सीएसटी यांदरम्यान चालणारी सेवा कुल्र्याऐवजी कल्याणहून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसपर्यंत चालवली जाणार आहे.

सध्या रात्री ११.१८ वाजता मुंबईहून कर्जतला जाणारी शेवटची जलद लोकल निघते. या लोकलची वेळ साडेअकराच्या पुढे नेण्याचा वा साडेअकरानंतर आणखी एक जलद लोकल चालवण्याचा विचारही मध्य रेल्वे करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसे झाल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.