परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना करोना होण्याचा धोका असल्याचे लक्षात घेऊन सर्व परीक्षा, व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या नीट, जेईई, सीईटीसारख्या प्रवेश परीक्षा पुढे ढकलाव्यात आणि देशातील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सध्याचे जूनपासून सुरू झालेले नवे शैक्षणिक वर्ष जानेवारी २०२१ पासून सुरू करावे, अशी मागणी पर्यावरणमंत्री आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी के ली आहे.

देशभरात प्रत्यक्ष वा ऑनलाइन परीक्षांसाठी सुरू असलेली प्रक्रि या, विविध व्यावसायिक अभ्यासक्र मांची प्रवेश प्रक्रि या स्थगित करून ती पुढे ढकलावी. त्याचबरोबर जून २०२० पासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दोन महिने उलटले असले तरी करोनामुळे शाळा-महाविद्यालये सुरू करता आलेली नाहीत. त्यामुळे  शैक्षणिक वर्ष वाया जात आहे. देशभरातील कोटय़वधी विद्यार्थ्यांचे हे नुकसान टाळण्यासाठी शैक्षणिक वर्ष जानेवारी २०२१ पासून सुरू करण्याबाबत विचार करावा, अशी विनंतीवजा मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

देशात करोना रुग्णांची संख्या वाढत असताना काही विद्यापीठे, व्यावसायिक अभ्यासक्र मांच्या संस्था या अंतिम वर्ष परीक्षा, प्रवेश परीक्षा घेण्याची प्रक्रि या राबवत आहेत. करोनामुळे बहुतांश राज्यात सार्वजनिक वाहतुकीच्या सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नसताना अशारितीने परीक्षा व प्रवेश परीक्षांचा घाट घालणे योग्य नाही, असे आदित्य ठाकरे यांनी या पत्रात नमूद केले आहे. जगात ज्या ज्या ठिकाणी शाळा-महाविद्यालये सुरू झाली तेथे करोनाचे रुग्ण झपाटय़ाने वाढल्याचे दिसून येते याकडेही ठाकरे यांनी मोदी यांचे लक्ष वेधले आहे. तुम्ही हस्तक्षेप करून हे निर्णय घेतल्यास करोनाची रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढण्याचा एक मोठा धोका टळेल, अशी पुस्तीही आदित्य ठाकरे यांनी जोडली आहे.

ममतांची केंद्र सरकारला विनंती

कोलकाता:करोनाच्या पार्श्वभूमीवर जेईई आणि ‘नीट’ परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केंद्र सरकारला केली.  केंद्र सरकारने धोका कितपत आहे त्याचा आढावा घ्यावा आणि स्थिती पुन्हा योग्य होईपर्यंत परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी विनंती बॅनर्जी यांनी केली आहे.