करोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून राज्यात एका दिवसात प्रथमच ५०० पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात २०,४८२ नवे रुग्ण आढळले असून, पुणे, सातारा, नाशिक, नागपूरमध्ये रुग्ण संख्या वाढतच आहे.

दिवसभरात राज्यात ५१५जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. यापूर्वी २४ तासात सर्वाधिक ४४८ जणांचा मृत्यू झाला होता. राज्यात आतापर्यंत करोनामुळे ३०,४०९ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील करोनाबाधित एकू ण रुग्णांची संख्या ही १० लाख ९७ हजार झाली असून, त्यापैकी ७ लाख ७५ हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात २ लाख ९१ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत.

गेल्या २४ तासात  नाशिक १०२९, नगर ६४६, जळगाव ५७३, पुणे शहर १८८९, पिंपरी-चिंचवड ८७१, उर्वरित पुणे जिल्हा १३०२, सातारा ११७, सांगली ९९७, नागपूर जिल्हा १७०० अशी रुग्णस्थिती होती.

मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी ५४ दिवसांवर

गेल्या काही दिवसांपासून दर दिवशी दोन हजाराच्यापुढे रुग्णसंख्या वाढत असताना मंगळवारी किंचित कमी म्हणजे १५८५ नवीन रुग्णांची नोंद झाली. मात्र ४९ रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील रुग्णवाढीचा दर वाढला असून रुग्ण दुपटीचा कालावधी दोन महिन्यांपेक्षाही कमी झाला आहे.

मुंबईतील रुग्णवाढीचा दर १.२८ टक्कय़ांवर आला आहे. मात्र अकरा विभागांचा रुग्णवाढीचा दर हा सरासरीपेक्षा जास्त आहे. यात बोरिवलीतील रुग्णवाढ सर्वात वेगाने होत असून या भागातील रुग्णवाढीचा वेग १.७२ टक्के आहे. त्याचबरोबर दहिसर, नानाचौक-ग्रॅंटरोड, अंधेरी-जोगेश्वरी पश्चिम, मुलुंड, कांदिवली, गोरेगाव, वांद्रे पश्चिम, डोंगरी-मशीद बंदर, चेंबूर, मालाड या भागात या आठवडय़ात वेगाने रुग्णवाढ झाली आहे. नव्याने १५८५ रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण बाधितांची संख्या १ लाख ७३ हजार ५३४ वर गेली आहे. मात्र एकाच दिवसात १७१७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. एका दिवसातील नवीन रुग्णांपेक्षा बरे होऊन गेलेल्या रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्याही थोडी कमी झाली आहे. आतापर्यंत १,३४,०६६ रुग्ण म्हणजेच ७७ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर ३०,८७९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मंगळवारी ४९ रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण संख्या ८२२७ वर गेली आहे. ४९ मृतांपैकी ३७ जणांना काही दीर्घकालीन आजार होते. तर ३३ रुग्णांचे वय ६० वर्षांंवर होते. मुंबईतील एकूण मृत्यूदर ४.७३ टक्कय़ांवर आला आहे.