संजय बापट

साखरेच्या दरातील सततची घसरण आणि उत्पादन खर्चात होणाऱ्या वाढीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या साखर उद्योगाला दिलासा देण्यासाठी राज्य बँकेने पुढाकार घेतला आहे. अडचणीतील कारखान्यांना मदत केली नाही तर यापूर्वी दिलेल्या कर्जाची परतफेड अडचणीत येण्याची शक्यता लक्षात घेऊन २४ साखर कारखान्यांना ३७५१ कोटी रूपांच्या कर्जवाटपास विशेष बाब म्हणून संमती देण्याचा प्रस्ताव राज्य सहकारी बँकेने राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँकेला (नाबार्ड) पाठवला. नाबार्डने अनुकूलता दर्शवल्यानंतर राज्य बॅंकेने कर्जवाटपाचा निर्णय घेतला.

गेल्या दोन वर्षांत साखरेचे अतिरिक्त उत्पादन,  साखरेच्या उत्पादन खर्चात झालेली वाढ आणि आंतरराष्ट्रीय बाजारात घसरलेले दर यामुळे साखर उद्योग आर्थिक संकटातून जात आहे. कारखान्यांनी कर्जे काढून ऊस उत्पादकांना रास्त आणि किफायतशीर भाव (एफआरपी) दिला. त्यातच यंदाच्या अतिवृष्टी, महापूर आणि परतीच्या पावसामुळेही साखर कारखान्यांना मोठा फटका बसला आहे. साखरेचे दर वाढले नसल्याने आणि एकरकमी एफआरपी देण्याचे कायदेशीर बंधन असल्याने अनेक कारखान्यांच्या आर्थिक अडचणीत भर पडली. साखर उद्योगाला मदत करणाऱ्या राज्य सहकारी बँकेने आतापर्यंत ६७ साखर कारखान्यांना ११ हजार ७७ कोटी रूपयांचे अर्थसाह्य़ दिले असून, त्यापैकी सहा साखर कारखान्यांचे ८१८ कोटींचे कर्ज थकले आहे. पाच कारखान्यांचे नक्त मूल्य(नेटवर्थ) उणे झाले आहे. उर्वरित ५७ साखर कारखाने मात्र बँकेच्या कर्जाची परतफेड नित्यनियमाने करीत आहेत. त्यातच आता साखर उद्योगावरील संकटामुळे २४ साखर कारखाने सध्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या कारखान्यांनी यापूर्वीही राज्य बँकेकडून कर्जाची उचल घेतली आहे. मात्र त्या कर्जाची परतफेड करण्यासोबतच शेतकऱ्यांना ऊस खरेदीचे पैसे देण्यासाठी आणि एकूणच कारखाना चालविण्यासाठी राज्य बँकेकडे पुन्हा कर्जाची मागणी केली आहे. त्यामध्ये क्रांतीवीर एच.के. अहिर(३१५कोटी), कुंभी कासारी (३१८ कोटी), मेसर्स अथनी शुगर लि.-रयत साखर कारखाना(८५कोटी)आणि उदयसिंह (पान महाप्रदेश)

(पान १वरून) गायकवाड(२५ कोटी), विश्वासराव नाईक  साखर कारखाना( १५०कोटी), दत्त शेतकरी साखर कारखाना(१०० कोटी), विघ्नहर सहकारी कारखाना(३०२ कोटी), आर.पवार शिरूर(१८९ कोटी), एस.एम.एस.एम.पाटील(३३०कोटी) शरयु अ‍ॅग्रो( २००कोटी) बी. चव्हाण साखर कारखाना( २४१ कोटी) सुंदररावजी सोळंकी साखर कारखाना(२६७ कोटी)संजीवनी कारखाना(१४६ कोटी) लोकमंगल अ‍ॅग्रो(१५० कोटी), ग्रीन पावर शुगर(१४२ कोटी), सदाशिवराव मंडलिक साखर कारखाना(२०१ कोटी) जयवंत शुगर (१५० कोटी) आणि  सिद्धी शुगर (११७ कोटी )अशी एकूण २४ साखर कारखान्यांनी राज्य बँकेकडे ३७५१ कोटी रूपये कर्जाची मागणी केली आहे. विशेष म्हणजे या सर्वच कारखान्यांचा एनडीआर उणे असल्याने त्यांना कर्ज देण्यास कोणीही तयार नाही. त्यामुळे कारखान्यांनी बँकेला साकडे घातले.

या कारखान्यांचा एनडीआर उणे असला तरी त्यांनी राज्य बँकेच्या कर्जाची सातत्याने परतफेड केली आहे. त्यामुळे या अडचणीतील कारखान्यांना आता कर्ज दिले नाही तर ते आर्थिक अडचणीत येतील. त्यामुळे बँकेचे पूर्वीचे कर्जही अडचणीत येईल अशी भूमिका घेत राज्य बँकेने या कारखान्यांना कर्ज देण्याची तयारी दर्शविली. मात्र त्यासाठी नाबार्डच्या परवानगीची गरज असल्याने याबाबतचा प्रस्ताव नाबार्डला पाठविण्यात आला. साखर उद्योगाच्या अडचणीबद्दल बोलताना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील यांनी,  साखरेच्या दरातील घरसण आणि उत्पान खर्चात होणारी वाढ यामुळे साखर उद्योग अडचणीत आला असून त्याला दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच राज्य बँक आणि राज्य सरकारनेही या उद्योगासाठी मदत करण्याची गरज असल्याचे सांगितले.

‘एनडीआर’ उणे असल्याने २४ कारखान्यांना कर्ज देण्यात अडचणी होत्या. मात्र, दोन वर्षांत परिस्थिती पूर्वपदावर आणण्याच्या अटींवर हे कर्ज देण्याबाबताच प्रस्ताव नाबार्डला पाठविण्यात आला. त्यास नाबार्डने अनुकूलता दर्शविली असून त्यानुसार या कारखान्यांना कर्ज देण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे.

– विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, राज्य बँकेचे प्रशासक मंडळ