20 February 2019

News Flash

स्टेट बँकेला १७ वर्षांत प्रथमच तोटा

डिसेंबर तिमाहीत १,८८६.५७ कोटींचा तोटा, बुडीत कर्जे लाख कोटींवर

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

डिसेंबर तिमाहीत १,८८६.५७ कोटींचा तोटा, बुडीत कर्जे लाख कोटींवर

देशातील सर्वात मोठय़ा स्टेट बँकेला यंदा तिमाही तोटय़ाला सामोरे जावे लागले आहे. वाढते थकीत कर्जे व त्यासाठी करावी लागणारी तरतूद यामुळे बँकेला गेल्या १७ वर्षांत प्रथमच तिमाही तोटा सहन करावा लागला आहे.

चालू वित्त वर्षांच्या प्रारंभीच पाच सहयोगी बँका व भारतीय महिला बँकांचे मुख्य स्टेट बँकेतील विलीनीकरण अस्तित्वात आले. तर तोटय़ातील वित्तीय निष्कर्षांच्या कालावधीतच सार्वजनिक क्षेत्रातील बँकेला रजनीश कुमार यांच्या रूपात नवा अध्यक्ष मिळाला.

स्टेट बँक समूहाने तिचे ऑक्टोबर ते डिसेंबर या २०१७-१८ मधील तिसऱ्या तिमाहीचे वित्तीय निष्कर्ष शुक्रवारी जाहीर केले. यात बँकेला १,८८६.५७ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. वर्षभरापूर्वी याच कालावधीत बँकेने २,१५२.१४ कोटी रुपयांचा नफा राखला होता.

बँक समूहाच्या निव्वळ बुडीत कर्जाचे प्रमाण एकूण वितरित कर्जाच्या तुलनेत ५.६१ टक्के राहिले आहे. वर्षभरापूर्वी हे प्रमाण ४.२४ टक्के होते. तर ढोबळ अनुत्पादित मालमत्ता प्रमाण १०.३५ टक्के अशा दुहेरी अंकापर्यंत झेपावले आहे. निव्वळ अनुत्पादित मालमत्ता वर्षभरापूर्वीच्या ६१,४३०.४५ कोटी रुपयांवरून दुप्पट, १ लाख कोटी रुपयांपुढे गेली आहे.

वाढते कर्ज आणि त्यासाठीची आर्थिक तरतूद यापोटी यंदा बँकेला तिमाही तोटय़ाला सामोरे जावे लागल्याचे स्पष्ट होत आहे. बँकेचे व्याजोत्तर उत्पन्न सुमारे २९.७५ टक्क्यांनी कमी झाले आहे. वर्षभरापूर्वीच्या ११,५०७ कोटी रुपयांवरून ते गेल्या तिमाहीत ८,०८४ कोटी रुपये झाले आहे. तर बिगर शुल्क उत्पन्न १८.३८ टक्क्यांनी कमी होत ते चालू वित्त वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीत ११,७५५ कोटी रुपयांवर आले आहे.

चढाओढ घसरणीची..

  • शुक्रवारी वित्तीय निष्कर्ष जाहीर करणाऱ्या तीन सरकारी बँकांनी डिसेंबरअखेर तिमाहीत वाढीव तोटा नोंदविला आहे. यामध्ये यूको बँक, आंध्र बँक व सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे.
  • बँक ऑफ बडोदा या अन्य बँकेच्या नफ्यात गेल्या तिमाहीत ५६ टक्क्यांची घसरण झाली आहे. बँकेला ऑक्टोबर ते डिसेंबर २०१७ दरम्यान १११.८० कोटी रुपयांचा नफा झाला. वर्षभरापूर्वी तो २८२.६० कोटी रुपये होता. बँकेच्या ढोबळ अनुत्पादित मालमत्तेचे प्रमाण ११.३१ टक्क्यांवर गेले आहे.
  • यूको बँकेचा तिसऱ्या तिमाहीतील तोटा १,०१६ कोटी रुपये, आंध्र बँकेचा तोटा ५३२ कोटी रुपये तर सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा तोटा १,६६४ कोटी रुपयांवर गेला आहे. यूको बँकेचे ढोबळ अनुत्पादित मालमत्तेचे प्रमाण २०.६४ टक्के, आंध्र बँकेचे १४.२६ टक्के तर सेंट्रल बँकेचे प्रमाण १८.०८ टक्के राहिले आहे.

First Published on February 10, 2018 12:53 am

Web Title: state bank of india in bad conditions