पुढील शैक्षणिक वर्षांपासून म्हणजे जून २०१४ पासून राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या शाळांमध्ये तिसरी, चौथी व पाचवीचा अभ्यासक्रम बदलणार आहे. शालेय शिक्षण विभागाने नुकताच हा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रीय अभ्यासक्रम  धोरणानुसार पुनर्रचनेचे काम सुरू असून गेल्यावर्षी घेतलेल्या निर्णयानुसार यंदा पहिली व दुसरीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला. पुढील वर्षी तिसरी, पाचवी व सातवीचा अभ्यासक्रम बदलला जाणार होता. मात्र यासंदर्भात फेरविचार करण्यात आला. एकाआड एक इयत्तांचा अभ्यासक्रम बदलला तर विद्यार्थ्यांचा गोंधळ उडेल. त्यामुळे पुनर्रचनेत सलगता येण्यासाठी पुढील वर्षी तिसरी ते पाचवी आणि जून २०१५ मध्ये सहावी, सातवी व आठवीचा अभ्यासक्रम बदलला जाईल.
शिक्षण विभागाने यासंदर्भात आदेश काढले असून बालभारतीने त्यानुसार क्रमिक पुस्तके पुढील वर्षी वेळेवर उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. आधीच्या निर्णयामागे कोणती कारणे होती व नवीन निर्णयामुळे विद्यार्थ्यांना कोणता लाभ होणार आहे, याबाबत मात्र प्रश्नचिन्ह आहे.