काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी राज्यातील काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांची शनिवारी नवी दिल्ली येथे बैठक आयोजित केली आहे. प्रदेशाध्यक्ष बदल, तसेच पाच राज्यांच्या विधानसभांच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या संदर्भात बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले.
राज्याच्या प्रभारीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर एच. के. पाटील यांनी पक्षसंघटनेत बदल करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेची पुढील वर्षी निवडणूक होणार आहे. काँग्रेसच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची आहे. त्याचा विचार करून मुंबई काँग्रेसमध्येही फेरबदल करून भाई जगताप यांच्याकडे अध्यक्षपद सोपविण्यात आले. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष बदलाबाबतही हालचाली सुरू केल्या आहेत.
प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे महसूलमंत्री आहेत, तसेच विधिमंडळ पक्षनेतेपदही त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपद अन्य नेत्याकडे सोपविण्याबाबत पक्षात विचार सुरू झाला आहे. या महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात पाटील यांनी मुंबईत पक्षाचे मंत्री, वरिष्ठ नेते, आमदार, पदाधिकारी यांच्या बैठका घेऊन प्रदेशाध्यक्ष बदलाबाबत त्यांची मते जाणून घेतली. त्या वेळी वेगवेगळी मते मांडण्यात आली. प्रदेशाध्यक्ष बदलण्याची एवढी घाई का केली जात आहे, असा प्रश्नही काही आमदारांनी उपस्थित केल्याचे समजते.
एच. के. पाटील यांनी शनिवारी दिल्लीत राज्यातील सर्व काँग्रेस मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. येत्या आगामी काळात पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुचेरी येथील विधानसभांच्या निवडणुका होणार आहेत. बैठकीत प्रदेशाध्यक्ष बदलाबरोबरच या निवडणुकांमध्ये काही जबाबदाऱ्या देण्याबाबत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात आले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 30, 2021 12:35 am