चैनसुख संचेती, संजयकाका पाटील यांची वर्णी

राज्यातील महामंडळांवरील गेल्या साडेतीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नियुक्त्यांना अखेर मुहूर्त मिळाला. राज्य सरकारने सोमवारी चार वैधानिक विकास मंडळ-महामंडळांवरील नियुक्त्यांची घोषणा केली असून विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी आमदार चैनसुख संचेती यांची, तर महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी खासदार संजयकाका पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.

राज्यात २०१४ मध्ये सत्तांतर होऊन भाजपचे सरकार आले. भाजप-शिवसेना सरकारला आता साडेतीन वर्षे झाली असतानाही राज्यातील विविध महामंडळे, विकास मंडळांवरील नियुक्त्या रखडल्या होत्या. त्यामुळे भाजपचे अनेक नेते, कार्यकर्ते नाराज होते.

आता निवडणुका तोंडावर असल्याने ही नाराजी दूर करण्यासाठी सोमवारी चार नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी दोन मंडळांचे अध्यक्ष व दोन महामंडळांच्या उपाध्यक्षपदांच्या नियुक्तीस मान्यता दिली होती. त्यानुसार महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्याबाबतची घोषणा केली.

विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी बुलढाणा जिल्ह्य़ातील मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी कोल्हापूरचे योगेश प्रतापसिंह जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचबरोबर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी अमरावतीचे आमदार डॉ. सुनील पंजाबराव देशमुख यांची तर महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

चौघांपैकी तिघे बाहेरचे

भाजपने जाहीर केलेल्या चार नियुक्त्यांमध्ये चैनसुख संचेती वगळता इतर तिघे तसे बाहेरचे आहेत. खासदार संजयकाका पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये आले. तर सुनील देशमुख हे कॉंग्रेसच्या सरकारमध्ये अर्थराज्यमंत्री होते. तेही २०१४ च्या निवडणुकीआधी भाजपमध्ये आले. तर योगेश जाधव हे ना भाजपचे लोकप्रतिनिधी आहेत ना पदाधिकारी.