कर व करेतर महसुलातील तुटीमुळे आर्थिक अडचणीला तोंड देणाऱ्या राज्य सरकारने खर्च भागवण्यासाठी पुन्हा ३ हजार कोटी रुपयांचे कर्जरोखे विक्रीस आणले आहेत. त्यामुळे एप्रिलपासून आतापर्यंतची कर्जरोखे विक्री ६५ हजार कोटी रुपयांचा टप्पा गाठणार आहे.

टाळेबंदीकाळात राज्य सरकारने कर्जरोख्यांच्या विक्रीवर भर दिला आहे. अर्थव्यवस्था अस्थिर असल्याने आणि महाराष्ट्राची पत चांगली असल्याने गुंतवणूकदारही महाराष्ट्राच्या कर्जरोख्यांना पसंती देत आहेत. त्यामुळे विविध विकासकामांना निधी पुरवण्यासाठी महाराष्ट्र राज्य विकास कर्ज या नावाने कर्जरोख्यांची विक्री केली जात आहे.

आता राज्य सरकारने प्रत्येकी एक हजार कोटी रुपयांच्या तीन कर्जरोखे विक्री योजना आणल्या आहेत. त्यापैकी एक ८ वर्षे, दुसरी १० वर्षे, तर तिसरी १२ वर्षे मुदतीची आहे. आतापर्यंत महाराष्ट्राने कर्जरोखे विकून ६२ हजार कोटी रुपयांचा निधी उभारला आहे. आता या ३ हजार कोटी रुपयांच्या रोख्यामुळे तो ६५ हजार कोटी रुपयांवर जाणार आहे.