05 April 2020

News Flash

राज्य मराठी विकास संस्था संचालकाच्या शोधात

१ मे १९९२ रोजी राज्य विकास मराठी संस्थेची स्थापना करण्यात आली.

विनोद तावडे

पाच वर्षांपासून संचालकच नाही; संकेतस्थळही मागासलेलेच; प्रभारी संचालकांकडे कारभाराची धुरा

‘मराठीचा विकास, महाराष्ट्राचा विकास’, असे बोधवाक्य असलेली राज्य मराठी विकास संस्था गेल्या पाच वर्षांपासून संचालकाविनाच कारभार हाकीत आहे. प्रभारी संचालक नेमून सध्या या संस्थेचा कारभार सुरू आहे. पाच वर्षांत ‘संचालक’ मिळू शकलेला नसताना संस्था मराठी व महाराष्ट्राचा काय विकास करणार, असा सवाल संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

मराठी भाषा आणि संस्कृतीचे जतन व संवर्धनासाठी १ मे १९९२ रोजी राज्य विकास मराठी संस्थेची स्थापना करण्यात आली. मुख्यमंत्री पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या या संस्थेच्या संचालकपदी २०१० या वर्षांपासून पूर्णवेळ संचालक नेमण्यात आलेला नाही. साहित्य व संस्कृती मंडळाच्या अध्यक्षांकडे दोन वर्षे प्रभारी संचालकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानंतर वरिष्ठ संशोधन साहाय्यक पदावरील व्यक्तीकडे प्रभारी संचालक पदाची जबाबदारी सोपविण्यात येत आहे. ज्येष्ठ साहित्यिका व समीक्षिका डॉ. सरोजिनी वैद्य (संचालक), ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके (उपसंचालक), ज्येष्ठ पत्रकार वसुंधरा पेंडसे-नाईक (संचालक) अशा मान्यवरांनी संस्थेचे संचालक म्हणून काम पाहिले आहे. २०१० मध्ये वसुंधरा पेंडसे-नाईक निवृत्त झाल्यानंतर अद्याप संस्थेला नवा संचालक मिळालेला नाही. साहित्य व संस्कृती मंडळाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्याकडे संचालकपदाची जबाबदारी दोन वर्षे सोपविण्यात आली होती. २०१२ नंतर आत्तापर्यंत वरिष्ठ संशोधन साहाय्यक पदावरील व्यक्तींकडे प्रभारी संचालक म्हणून काम सोपविण्यात आले आहे.

कार्यालयाची जागा अपुरी

राज्य विकास मराठी संस्थेचे कार्यालय एलफिन्स्टन तंत्र महाविद्यालयाच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर आहे. संस्थेचा एकूण व्याप पाहता ही जागा खूप अपुरी आहे. सुसज्ज ग्रंथालय, ध्वनिप्रयोग शाळा, संगणक विभाग, व्याख्यान कक्ष, ध्वनिमुद्रण कक्ष, अभिलेख, ध्वनिफिती, चित्रफिती, लोककला नमुने जतन करण्याची व्यवस्था आदी सर्व गोष्टींसाठी संस्थेला प्रशस्त कार्यालयाची गरज असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

संकेतस्थळही अद्ययावत नाही

राज्य मराठी विकास संस्थेचे संकेतस्थळही अद्ययावत नाही. संस्थेचे प्रकल्प व उपक्रम याची माहिती देणाऱ्या विभागात १ नोव्हेंबर २०१४ अशी तारीख संकेतस्थळाच्या पानावर दिसत असून त्यात संस्थेच्या प्रकल्पांची माहिती देण्यात आली आहे. उपक्रमाच्या पानावर गेले तर कार्यशाळा, चर्चासत्रे, शासनास कार्यवाहीसाठी सादर केलेले अहवाल, सर्वेक्षणे असा मजकूर दिसतो. पण तो १९९४ ते २०१२ या कालावधीतील आहे. संस्थेतर्फे मराठी संकेतस्थळांची स्पर्धा भरविण्यात येते. मात्र संस्थेच्या संकेतस्थळावर २०१३ या वर्षांतील निकाल पाहण्यासाठी क्लिक करा, असे दिसते. राज्य शासनाच्या <https://rmvs.maharashtra.gov.in>या संकेतस्थळावर राज्य मराठी विकास संस्थेची माहिती, उपक्रम पाहायला मिळतात.

राज्य मराठी विकास संस्थेचे अध्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत. त्यांनी संस्थेचा कारभार चालविण्यासाठी काटीकर यांची प्रभारी संचालक म्हणून नेमणूक केली आहे. यापूर्वी संचालक पदाची निवड प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र, त्यास विधी व न्याय विभागाने नियमबाह्य़ असल्याचा आक्षेप घेतला, त्यामुळे ती थांबविण्यात आली. तसेच दोन महिन्यांपूर्वी संस्थेच्या नियामक मंडळाच्या सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे आता लवकरच संचालक निवडीची कार्यवाही केली जाईल.

– विनोद तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2016 4:17 am

Web Title: state development agency marathi director for
Next Stories
1 एसटीच्या फलकावर कुसुमाग्रजांपेक्षा बाळासाहेब मोठे!
2 सर्व पोलीस ठाण्यांना ‘ब्रेथ अ‍ॅनालायझर’ द्या!
3 सौरभ कुलकर्णी, चिन्मय पाटील ‘ब्लॉग बेंचर्स’चे विजेते
Just Now!
X