महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या हौशी राज्य नाटय़ स्पर्धेच्या मुंबई विभागात ४९ नाटके सादर झाली. १८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडली. रवींद्र नाटय़ मंदिर, साहित्य संघ मंदिर, यशवंत नाटय़ मंदिर या तीन केंद्रांवर स्पर्धेतील नाटके सादर झाली. यंदाच्या स्पर्धेत साहित्य संघ मंदिर केंद्रात सादर झालेल्या ‘असुरवेद’ (बृहन्मुंबई महापालिका कर्मचारी कलावंत संस्था) या नाटकाला प्रथम पारितोषिक मिळाले.
मुंबई विक्रीकर सांस्कृतिक विभागाच्या ‘वारकरी’ या नाटकाला द्वितीय तर बेस्ट कला आणि क्रीडा मंडळाच्या ‘भिंती’ या नाटकाला तिसरे पारितोषिक मिळाले. रमेश थोरात, श्रीपाद जोशी, सुहास वाळुंजकर यांनी परीक्षक म्हणून तर प्रभाकर वारसे यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.
रवींद्र नाटय़ मंदिर या केंद्रात सादर झालेल्या नाटकांमधून ‘धुऑं’ (मोरया प्रतिष्ठान)हे नाटक प्रथम आले तर द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे बृहन्मुंबई पोलीस कल्याण विभागाच्या ‘रंग’ आणि ‘खिडकी’ (रंगसंगती कलामंच) यांची निवड करण्यात आली. वसंत सामदेकर, अनिल कुलकर्णी, सुहास जोशी यांनी परीक्षक तर राकेश तळगावकर यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.
यशवंत नाटय़ मंदिर केंद्रातून ‘बेबी’ (बृहन्मुंबई महापालिका प्रमुख कामगार अधिकारी-शहर) या नाटकाला प्रथम तर ‘आसाचा फेरा’ (माझगाव डॉक स्पोर्ट्स क्लब कला विभाग) आणि ‘एका उत्तराची कहाणी’ (द मानवता असोसिएशन) यांना अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळाला. गणेश वडोदकर, रवींद्र कुलकर्णी, विनिता पिंपळखरे यांनी परीक्षक तर उमेश घळसासी यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.
तीनही केंद्रांतून प्रथम आलेल्या नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. रवींद्र नाटय़ मंदिरात बृहन्मुंबई पोलीस कल्याण विभागाने सादर केलेल्या ‘रंग’या नाटकाची सुमारे साडेसहाशे तिकिटांची विक्री झाली. यंदाच्या स्पर्धेत जुन्या नाटय़संस्था, शासकीय आणि नीमशासकीय तसेच खासगी कार्यालये, युवा रंगकर्मी हे मोठय़ा संख्येत सहभागी झाले होते.