राष्ट्रीय क्रमवारीत मुंबई विद्यापीठ पहिल्या शंभरात देखील नाही

राज्यातील उच्च आणि तंत्रशिक्षणाची यथातथा परिस्थिती शिक्षणसंस्थांच्या राष्ट्रीय क्रमवारीतून सलग दुसऱ्या वर्षी दिसून आली आहे. देशभरातील पहिल्या शंभर शिक्षणसंस्थांमध्ये राज्यातील अकरा संस्थांचा समावेश असून मुंबई विद्यापीठ क्रमवारीत दीडशेच्याही पुढे फेकले गेले आहे. खासगी संस्था आणि अभिमत विद्यापीठे यांचेच या यादीत वर्चस्व आहे.

केंद्रीय शिक्षणसंस्थानी मात्र आपले स्थान राखले आहे. गेल्यावर्षी प्रमाणेच देशात बंगळुरू येथील इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सने पहिले स्थान, इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, (आयआयटी), मद्रास यांनी दुसरे तर आयआयटी मुंबईने तिसरे स्थान राखले आहे. राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सोळावे स्थान मिळवले आहे. खासगी संस्थाकडून जाहीर करण्यात येणारी शिक्षणसंस्थांची क्रमवारी ही जाहीरातबाजी असल्याचा आरोप सातत्याने केला जात असे. त्याचप्रमाणे या संस्थांनी निश्चित केलेले निकष हे देशभरातील सामाजिक परिस्थितीच्या अनुषंगाने नसतात अशीही टीका सातत्याने होत असते. या पाश्र्वभूमीवर राष्ट्रीम मनुष्यबळ विकास मंत्रालयानेच देशातील शिक्षणसंस्थांची क्रमवारी जाहीर करण्यास सुरूवात केली. या क्रमवारीत सहभागी होणाऱ्या देशभरातील आणि राज्यातीलही शिक्षणसंस्थांची संख्या यंदा मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, विद्यार्थ्यांची रोजगारभिमुखता, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद अशा साधारण २० घटकांचा विचार करून ही क्रमवारी निश्चित करण्यात आली. देशभरातील अर्ज केलेल्या सर्व शिक्षणसंस्था, विद्यापीठे, महाविद्यालये, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन, वैद्यकीय, विधी, वास्तूकला या विद्याशाखांच्या संस्था अशी वर्गवारी करून ही क्रमवारी जाहीर करण्यात आली.

महाराष्ट्राची स्थिती

राज्य विद्यापीठांपैकी फक्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला पहिल्या शंभर संस्थांमध्ये आपले स्थान राखता आले आहे. देशातील ९५७ संस्था यामध्ये सहभागी झाल्या असून त्यापैकी १३६ संस्था महाराष्ट्रातील आहेत.  पुणे विद्यापीठ देशातील एकूण शिक्षणसंस्थांमध्ये सोळाव्या तर विद्यापीठांमध्ये नवव्या स्थानावर आहे. मुंबई विद्यापीठाचा क्रमांक हा दीडशे ते दोनशेच्या दरम्यान आहे. नागपूर विद्यापीठाचा क्रमांकही दीडशेच्या खाली आहे. औरंगाबाद विद्यापीठाला शंभर ते दीडशे या दरम्यान स्थान मिळाले आहे. गेल्यावर्षी स्थान मिळवलेल्या राज्यातील संस्थांची क्रमवारीही यंदा घसरली आहे. राज्यात सर्वाधिक महाविद्यालये असलेल्या अभियांत्रिकी शिक्षणाची परिस्थितीही सुधारलेली नाही. अभियांत्रिकी महाविद्यालयांपैकी १३१ महाविद्यालयांनी अर्ज केला होता त्यापैकी अवघ्या ९ संस्थांना पहिल्या शंभर संस्थांमध्ये स्थान मिळाले आहे. व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या अर्ज केलेल्या ७४ संस्थांपैकी ५, औषधनिर्माण शास्त्र शाखेच्या ४१ संस्थांपैकी ११ संस्थांना पहिल्या पन्नासमध्ये स्थान मिळाले आहे. अर्ज केलेल्या १४ वैद्यकीय शिक्षणसंस्थांपैकी एका संस्थेला, विधी महाविद्यालयांमध्ये १३ पैकी एका संस्थेला तर वास्तूकला शाखेच्या आठ संस्थांपैकी एकाही संस्थेला क्रमवारीत स्थान मिळवता आलेले नाही.

क्रमवारीत स्थान मिळालेल्या संस्था (कंसात क्रमवारी)

आयआयटी, मुंबई (३), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (१६), इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी), मुंबई (३०), आयसर, पुणे (३२), होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूट, मुंबई (४१), टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्स, मुंबई (४९), सिम्बॉयसिस इन्स्टिटय़ूट, पुणे (६७), डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे (७९), नरसी मोनजी इन्स्टिटय़ूट, मुंबई (८२), भारती विद्यापीठ, पुणे (९३), शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे (९६)

राज्याची प्रगती होईना..

राज्यातील उच्च शिक्षण संस्थांमधील संख्यात्मक वाढीत आघाडी गाठलेल्या महाराष्ट्राला दर्जावाढीचा पल्ला अजून गाठता आलेला नसल्याचे या क्रमवारीतून समोर आले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत पहिल्या शंभर संस्थांमध्ये स्थान मिळवणाऱ्या राज्यातील शिक्षणसंस्थांची संख्या काकणभर वाढून ९ वरून ११ पर्यंत पोहोचली आहे. मात्र त्यामध्ये शासकीय संस्था आणि राज्य विद्यापीठांना आपली कामगिरी दाखवता आलेली नाही. खासगी, अभिमत विद्यापीठांनाच या क्रमवारीत स्थान मिळाले आहे.

देशातील पहिले

  • सर्व संस्था आणि विद्यापीठे – इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, बंगळुरू
  • महाविद्यालये – मिरांडा हाऊस, दिल्ली
  • अभियांत्रिकी – आयआयटी, मद्रास
  • व्यवस्थापन – आयआयएम, अहमदाबाद
  • औषधनिर्माणशास्त्र – नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, मोहाली
  • वैद्यकीय – ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स, दिल्ली
  • वास्तूकला – आयआयटी, खरगपूर
  • विधी – नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया, बंगळुरू

विद्यापीठे –

  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (९), आयसीटी, मुंबई (१९), होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूट, मुंबई (२६), टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्स, मुंबई (३२), सिम्बॉयसिस इन्स्टिटय़ूट, पुणे (४४), डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे (५२), नरसी मोनजी इन्स्टिटूट, मुंबई (५५), भारती विद्यापीठ, पुणे (६६), डी. वाय. पाटील, कोल्हापूर (९७)

महाविद्यालये –

  • फर्गसन, पुणे (१९), राजीव गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी, पुणे (६२), सेंट झेविअर्स (७४),भारती विद्यापीठ ऑफ फाईन आर्ट्स (९३)

अभियांत्रिकी महाविद्यालये –

  • आयआयटी, मुंबई (२), आयसीटी, मुंबई (१०), विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर (३१), नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इन्डस्ट्रियल इंजिनिअरिंग, मुंबई (४४), शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे (४५), डिफेन्स इन्स्टिटय़ूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलॉजी, पुणे (६३), भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे (८३), आर्मी इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे (८८), व्हीजेटीआय, मुंबई (९५)

व्यवस्थापन संस्था –

  • आयआयटी, मुंबई (५), नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इन्डस्ट्रियल इंजिनिअरिंग, मुंबई (१४), सिम्बॉयसिस विद्यापीठ, पुणे (१८), एस. पी. जैन इन्स्टिटय़ूट, मुंबई (१९), नरसी मोनजी इन्स्टिटय़ूट (२४), आयएमईडी, पुणे (५०)

औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालये

  • आयसीटी, मुंबई (४), बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी, (८), नरसी मोनजी इन्स्टिटय़ूट, मुंबई (९), पुना कॉलेज (११), डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज, मुंबई (३२), वाब. बी. चव्हाण कॉलेज, औरंगाबाद (३४), आर. सी. पटेल, शिरपूर (४०), भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी, नवी मुंबई (४२), किशोरीताई भोयर, कामटी (४४), डी. वाय. पाटील कॉलेज, पुणे (४९)

वैद्यकीय महाविद्यालये –

  • डी. वाय. पाटील महाविद्यालय, पुणे (१८)

विधि महाविद्यालये –

  • सिम्बॉयसिस विधि महाविद्यालय, पुणे (९)