नववर्षांच्या स्वागत कार्यक्रमात बनावट विदेशी मद्याचा पुरवठा केला गेला तर तो तात्काळ ओळखणे आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना शक्य होणार आहे. विदेशी मद्याची सत्यता पडताळण्यासाठी या यंत्राचा वापर केला जाणार आहे. ही यंत्रे विविध उत्पादक कंपन्यांनी उपलब्ध करून देण्याचे मान्य केले आहे, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सिंघल यांनी सांगितले.
मालवणी (मालाड) येथे भेसळयुक्त हातभट्टीचे सेवन केल्यामुळे शंभरहून अधिक नागरिकांना जीव गमवावा लागल्यानंतर अधिकच सतर्क झालेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने जोरदार कारवाई सुरू केली होती.
नवे आयुक्त सिंघल यांनी ‘हातभट्टी निर्मूलन सप्ताह’ आयोजित करून राज्यभरात सात हजारांहून अधिक गुन्हे दाखल केले. याशिवाय हातभट्टीवर जोरदार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याच वेळी सर्वच पद्धतीच्या भेसळयुक्त मद्याच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यभरात १११ विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत. नववर्ष स्वागत कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकांनी मद्यसाठा कोठून घेतला हे कळविणे बंधनकारक असून त्यांनी दिलेल्या या माहितीची शहानिशा केली जाणार आहे.

काय असेल हे यंत्र?
टीव्हीच्या रिमोटप्रमाणे दिसणाऱ्या या यंत्राचा वापर तूर्तास फक्त बनावट विदेशी मद्याच्या सत्यतेसाठीच केला जाणार आहे. डियाजिओ या कंपनीने उपलब्ध करून दिलेल्या या यंत्रामुळे ‘जॉनीवॉकर’सह कंपनीच्या अन्य विदेशी मद्याची सत्यता ओळखता येणार आहे. विदेशी मद्याच्या बाटलीच्या बुचाजवळ हे यंत्र बसविले जाते. त्यानंतर हिरवा किंवा लाल दिवा प्रकाशित होतो. हिरवा दिवा म्हणजे विदेशी मद्य योग्य असल्याचे तर लाल दिवा म्हणजे विदेशी मद्य भेसळयुक्त आहे, असे ओळखावे.

दक्षिण मुंबईत या यंत्राचा वापर करून अनेक मद्यविक्रीच्या दुकानांची तपासणी करण्यात आली. राज्यभरात या यंत्राचा वापर केला जाईल. तूर्तास एका कंपनीचे यंत्र उपलब्ध असले तरी आणखी काही कंपन्यांशी संपर्क सुरू आहे. लवकरच शासनाची मान्यता घेऊन ही यंत्रे मोठय़ा प्रमाणात उपलब्ध करून देता येतील. त्यामुळे भेसळयुक्त मद्याला आळा बसू शकेल.
– विजय सिंघल, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क