राज्य उत्पादन शुल्क विभागाची शहरात २६ पथके

नववर्ष स्वागताच्या निमित्ताने शहरात होणारा भेसळयुक्त, अवैध दारूचा पुरवठा रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांनी सर्वत्र झाडाझडती सुरू केली आहे. शहरातील दारूकांडांचा इतिहास लक्षात घेता या पथकांनी शहराबाहेरून होऊ घातलेल्या संभाव्य गावठी दारूच्या तस्करीवरही लक्ष केंद्रित केले आहे.

शहरात विषारी गावठी दारू प्यायल्याने मृत्यूसत्राच्या चार घटना घडल्या आहेत. अखेरची घटना मालाड, मालवणी येथे २०१५मध्ये घडली. त्यात १०२ जणांचा मृत्यू झाला होता. तर ४५ जण जखमी झाले होते. तत्पूर्वी २००४मध्ये विक्रोळी येथे नाताळदरम्यान घडलेल्या दारूकांडात ८७ जण मृत्युमुखी पडले होते. ही पाश्र्वभूमी लक्षात घेता राज्य उत्पादन शुल्क विभागाने नाताळ, थर्टीफर्स्टनिमित्त शहरात गावठी दारू येऊ नये यासाठी विशेष उपाययोजना केली आहे.

दर वर्षी २५ ते ३१ डिसेंबरदरम्यान मद्यविक्रीचे प्रमाण वाढते. मद्यविक्री करणारी दुकाने (वाइनशॉप), बार आणि अन्य आस्थापनांमध्ये मद्य विकत घेण्यासाठी आणि पिण्यासाठी एकच गर्दी होते. भेसळयुक्त दारू विकणाऱ्या टोळ्या ही संधी साधतात, असा अनुभव दर वर्षी पोलीस, उत्पादन शुल्क विभागाला येतो. प्रत्यक्षात दमण येथील कमी दर्जाचे मद्य उंची मद्यात मिसळून भेसळ केली जाते. त्याशिवाय गोवा, दमण किंवा अन्य राज्यांतून कर बुडवून मुंबई, महाराष्ट्रात दारू तस्करीही केली जाते. हे प्रकार रोखण्यासाठी विभागाने खबऱ्यांच्या माध्यमातून अवैध दारू साठा, दारू भेसळ करणाऱ्यांची माहिती मिळवण्याचे प्रयत्न चालवले आहेत. त्यासाठी विभागाने शहरात २६ विशेष पथके तैनात केली आहेत. ही पथके परवाना असलेली दुकाने, आस्थापनांमध्ये जाऊन तपासणी करत आहेत.