राज्य सरकारने पुणे येथील प्राथमिक संचालनालयातील उपसंचालकांची प्रतिनियुक्तीवर मुंबई महापालिकेतील शिक्षणाधिकारी पदावर नेमणूक केली आहे, मात्र त्यांच्याकडे उपसंचालकपदाचा भार कायम ठेवून शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त भार सोपविण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या आदेशामुळे शिक्षणाधिकारी पदावर व्यक्तीची नियुक्ती करण्याबाबतचे पालिकेचे नियम आणि निकष बासनात गुंडाळले गेले असून त्याबाबत पालिका अधिकाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तर उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी पदाचा भार वाहणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार मुंबई-पुणे अशी वारी करावी लागणार आहे. परिणामी, पालिकेच्या शिक्षण विभागाचा खेळखंडोबा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भाजप नगरसेवकांचे पालिकेच्या शिक्षणाधिकारी शांभवी जोगी यांच्याशी बिनसल्यामुळे उभयतांमध्ये गेले अनेक दिवस वाद सुरू होता. निरनिराळ्या मार्गानी शांभवी जोगी यांना पदावरून हटविण्याचे प्रयत्नही भाजपकडून करण्यात आले, मात्र त्यात भाजप नगरसेवकांना अपयश आले. अखेर राज्य सरकारने २८ ऑक्टोबर २०१५ रोजी प्राथमिक संचालनालयातील उपसंचालक डी. टी. टेमकर यांची पालिकेच्या शिक्षणाधिकारी पदावर प्रतिनियुक्तीवर नेमणूक करण्याचे आदेश दिले होते, मात्र या आदेशाविरुद्ध शांभवी जोगी यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने स्थगिती आदेश दिल्यामुळे डी. टी. टेमकर यांची नेमणूक होऊ शकली नाही. शांभवी जोगी यांची याचिका १८ फेब्रुवारी २०१६ रोजी न्यायालयाने निकाली काढली. त्यामुळे सरकारने २८ ऑक्टोबर २०१५ चे आदेश रद्द केले आणि सुधारित आदेश जारी करीत टेमकर यांच्याकडे प्राथमिक संचालनालयाच्या उपसंचालकपदाबरोबरच पालिकेच्या शिक्षणाधिकारी पदाचा भार सोपविण्यात आला. आता प्रतिनियुक्तीवर अधिकाऱ्याची नेमणूक करून जोगी यांना पदावरून हटविण्यात आल्याने सेना, भाजपमध्ये वादाची चिन्हे आहेत.
प्रतिनियुक्तीवर आलेले पालिकेचे शिक्षणाधिकारी प्राथमिक संचालनालयात उपसंचालकही आहेत. त्यामुळे त्यांना राज्य सरकार वेतन देणार की पालिका? प्रतिनियुक्तीवर टेमकर यांची नेमणूक करण्यात आल्यामुळे पालिकेच्या शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकाऱ्यांची शिक्षणाधिकारी होण्याची संधी हुकणार आहे.
– रमेश जोशी