ठेके दारांची बिले मात्र चुकती; विनोद तावडे यांचा आरोप

करोनाच्या संकटाचा मुकाबला करण्याकरिता केंद्र सरकारने विविध वर्गाच्या फायद्याकरिता मोठय़ा प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला. याउलट राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आरोग्य खात्याचा अपवाद वगळता सामान्य जनतेसाठी कोणताही खर्च केलेला नाही. उलट या काळात ठेके दारांची बिले चुकती करण्यात आल्याचा आरोप भाजप नेते, माजी मंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी केला.

सर्वसामान्य नागरिकांबरोबरच ज्येष्ठ नागरिक, महिला, छोटे उद्योजक यांच्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. सर्व वर्गाना याचा फायदा मिळेल या दृष्टीने खबरदारी घेतली. याउलट महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने आरोग्य खात्यावरील खर्च वगळता सामान्य जनतेसाठी काहीच निधी दिलेला नाही. मुंबई, नागपूर, पुणे महानगरपालिकांनी त्यांच्या तिजोरीतून खर्च केला. सामान्य नागरिक, शेतकरी, गरीब व वंचित वर्गाला राज्य शासनाने आपल्या तिजोरीतून काहीच दिलेले नाही. करोनाचे संकट असतानाही मार्चअखेर जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभागातील ठेकेदारांची बिले देण्यात आली.  ठेकेदारांना देण्यासाठी या सरकारकडे पैसे आहेत, पण गोरगरिबांना मात्र काहीच मदत दिली नाही, असा आरोपही तावडे यांनी केला.

टाळेबंदीच्या काळात वांद्रे टर्मिनस येथे हजारो जणांचा जमाव जमा होतो आणि पोलिसांना त्याचा सुगावाही लागला नाही. हे सारे पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांचे अपयश आहे. हे अपयश लपविण्यासाठीच वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला अटक करण्यात आली. जमलेला जमाव हा नाका कामगारांचा होता आणि त्या कामगारांचे नेतृत्व डाव्या पक्षाच्या युनियनकडे आहे. या संघटनेचा काही संबंध आहे  का, याचाही तपास करण्याची मागणी त्यांनी केली.  अमरावतीमध्ये सरकारच्या धोरणावर समाज माध्यमातून टीका केली म्हणून एकाला अटक करण्यात आली. यावरून टीका कराल तर तुरुंगात जावे लागेल, असा संदेशच ठाकरे सरकारने पत्रकार आणि सामान्य नागरिकांना दिल्याचेही तावडे म्हणाले.

टीका करणाऱ्यांवर कारवाई

सरकारच्या ध्येयधोरणांवर टीका करणाऱ्या किं वा लोकांना माहिती देणाऱ्या वृत्तपत्र प्रतिनिधींच्या विरोधात कारवाई करण्याचा सपाटा उद्धव ठाकरे सरकारने लावल्याचा आरोपही तावडे यांनी केला.