News Flash

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे नेते र.ग. कर्णिक यांचे निधन

अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे अनेक वर्षे देशपातळीवर त्यांनी नेतृत्व केले.

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे नेते र.ग. कर्णिक यांचे (वय ९१) शनिवारी वांद्रे येथील घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच कर्मचारी चळवळीतील नेत्यांनी दु:ख व्यक्त केले.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची त्यांनी मजबूत संघटना बांधली होती. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांनी अनेक लढे देऊन त्यांना सेवा शर्ती व वेतनाचे लाभ मिळवून दिले. त्यांच्या लढाऊ बाण्यामुळे संघटनेचा राज्यकत्र्यांवर कायम वचक राहिला. कर्णिक यांनी राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे सलग ५० वर्षे नेतृत्व केले. अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे ते मानद अध्यक्ष होते. १९७७ मधील त्यांच्या नेतृत्वाखाली राज्य कर्मचाऱ्यांचा ५४ दिवसांचा संप हा कामगार-कर्मचारी चळवळीतील मैलाचा दगड ठरला. त्या आंदोलनामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे राज्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्याचे धोरण अमलात आले.

रमाकांत गणेश ऊर्फ र.ग. कर्णिक यांचा जन्म २७ जानेवारी १९३० रोजी झाला. १९५६ मध्ये प्रथम त्यांनी मंत्रालयीन कर्मचारी संघटना बांधली. १९६२ मध्ये राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेची स्थापना केली, तेव्हापासून २०१४ पर्यंत या संघटनेचे त्यांनी नेतृत्व केले. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबरोबरच कामगार-कर्मचारी संयुक्त आंदोलनाचेही त्यांनी नेतृत्व केले. १९९१ पासून खाजगीकरण व कंत्राटीकरणाच्या विरोधात लढा उभारला.

अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे अनेक वर्षे देशपातळीवर त्यांनी नेतृत्व केले. कॉ. डांगे प्रतिष्ठानचे ते विश्वस्त व अध्यक्ष होते. संयुक्त कामगार-कर्मचारी कृती समितीचे ते अध्यक्ष होते. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कामगार  चळवळीत न्याय्य हक्कांसाठी लढताना सामाजिक भान राखणे महत्त्वाचे असते. र.ग. कर्णिक यांच्या निधनाने असा संवेदनशीलतेचा धडा घालून देणारा नेता हरपला. संघटना पक्षातीत ठेवणे आणि गरज पडल्यास समाजाच्या हाकेला धावून जाण्याची त्यांची शिकवण यापुढेही मार्गदर्शक ठरेल.   – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

राज्य कर्मचाऱ्यांचे अलोट प्रेम, अतूट विश्वास लाभलेले ते कामगार नेते होते. संघर्ष करायचा, परंतु तुटेपर्यंत ताणायचे नाही, याचा विसर त्यांना कधी पडला नाही. राज्य शासन आणि कर्मचारी संघटनांमध्ये नेहमीच समन्वय, सहकार्याचे वातावरण राहिले, याचे श्रेय कर्णिकसाहेबांच्या नेतृत्वालाही जाते.

– अजित पवार, उपमुख्यमंत्री

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2021 3:08 am

Web Title: state government employee leader karnik passed away akp 94
Next Stories
1 उपाहारगृहे आणि मद्यालये रात्री १ पर्यंत सुरू
2 सामाजिक समतोलासाठी ‘ओबीसी’ चेहरा
3 महाविद्यालयात समुपदेशन सुविधा उपलब्ध करून द्या!
Just Now!
X