देशातील सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रेरणास्थान लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या १६०व्या जयंतीचे निमित्त साधून राज्य सरकारने तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर वर्षभर लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षण विभागाच्या निधीतून या अभियानावर खर्च करण्यात येणार आहे.

मुंबई व अन्य महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या तोंडावर या अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची प्रसिद्धी करून सत्ताधारी भाजप व शिवसेनेकडून राजकीय प्रचार करण्याची संधी साधली जाणार असल्याचे दिसते.

देशात व राज्यात लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व गणेशोत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा करण्यात येऊ लागला. यंदा लोकमान्यांची १६०वी जयंती आहे. त्यांनी सुरू केलेल्या गणेशोत्सव चळवळीला या वर्षी १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचबरोबर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच, या त्यांच्या ऐतिहासिक उद्गाराचे हे शतकमहोत्सवी वर्ष आहे. हा योगायोग साधून राज्य सरकारने २०१६-१७ या वर्षांत लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाच्या माध्यमातून तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर गणेश उत्सव मंडळांच्या सहभागातून गणेशमूर्ती, देखावे, सामाजिक संदेश, यांवर स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यातून राज्य सरकारच्या बेटी बचाव बेटी पढाव, स्वदेशी, जलसाक्षरता, इत्यादी योजनांचा प्रचार करण्यात येणार आहे. शासनाने ठरविलेल्या निकषानुसार स्पर्धेत यशस्वी ठरणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना बक्षिसे दिली जाणार आहेत. त्याचबरोबर जिल्हा स्तरावर उत्कृष्ट गणेशमूर्तिकारांनाही रोख रकमेची बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे. या अभियानावर शिक्षण विभागाच्या निधीतून खर्च करण्यात येणार आहे.

पुढील वर्षांच्या सुरुवातीलाच राज्यात मुंबईसह दहा मोठय़ा महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. त्यानंतर काही महिन्यात जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्याही निवडणुका होणार आहेत. या पाश्र्वभूमीवर वर्षभर गणेशोत्सव अभियान राबवून व त्यातून शासकीय योजनांची प्रसिद्धी करून सत्ताधारी पक्षांकडून निवडणूक प्रचाराची संधी साधली जाणार असल्याचे मानले जात आहे.