राज्य सरकार महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय करत असून अंतर्गत गुण न दिल्यामुळेच यंदाचा दहावीचा निकाल घसरला असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजितपवार यांनी केली.

सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण दिले गेले मात्र महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांना ते दिले गेले नाहीत. सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अॅडमिशन घेताना मोठी अडचण होणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.


महाराष्ट्र बोर्डातील मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमातील विद्यार्थ्यांवर अन्याय होवू देवू नका. सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, पवार यांनी मांडलेल्या विषयाला उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल शिवाय ज्यांना कमी गुण मिळाले व अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सरकारकडून नक्कीच दिलासा दिला जाईल असे आश्वासन दिले.