कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर गेल्यानंतर महाराष्ट्राला कृषीमंत्री नाही. या सरकारला दुष्काळाचं गांभीर्य नाही अशी टीका करत राज ठाकरेंनी राज्य सरकारवरही निशाणा साधला. पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालासंदर्भात राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. सध्या चंद्रकांत पाटील यांच्याकडेच कृषी खात्याची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. एकेका मंत्र्याकडे तीन-चार खाती देण्यात आली आहेत. असल्या कारभाराला काय अर्थ आहे? असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे.

राज्यात दुष्काळ पडला आहे तरीही सरकारला त्याचं गांभीर्य नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत असेही राज ठाकरेंनी म्हटले तसेच जे पाच राज्यात घडले तेच महाराष्ट्रातही होऊ शकते कारण लोक जुलमी राजवटीला कंटाळले आहेत असाही आरोप राज ठाकरेंनी केला. देशात राम मंदिर उभारण्याचे वातावरण नसताना हा भावनेचा मुद्दा काढला जातोय. देशात भाजपा सरकारने काही केलेलच नाही त्यामुळे लोकांसमोर जायचं कसं यासाठी हा उद्योग सुरु आहे.

या देशातील लोकांनी किती थापा ऐकायच्या, देशाची परिस्थिती लोकांना माहिती आहे. राजीनामा दिलेले आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेलही काही दिवसांनी बोलतील. त्यांनाही ही मोठ्या धोक्याची घंटा वाटली असेल, त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिला.