करोना संकटकाळात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या आणि मृत्यूदर आहे. हा मृत्यूदर कमी करून अधिकाधिक लोकांना करोनामुक्त करण्यासाठी ठोस उपाययोजना सुचवण्यात राज्य सरकार कमी पडत आहे, राज्य सरकारला या परिस्थितीचे गांभीर्य नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी मंगळवारी केली.

भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित राणे यांच्या पत्रकार परिषदेस मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आणि माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक उपस्थित होते. यावेळी राणे म्हणाले की, राज्यात करोना रुग्णांची संख्या व  मृत्यूदर वाढत असताना  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरातूनच दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून राज्याचा कारभार सांभाळत आहेत.  मुख्यमंत्री घरातच बसून राहिल्यामुळे अधिकाऱ्यांवर कोणाचाच दबाव नाही. त्यामुळे राज्य सर्वच क्षेत्रात पिछाडीवर जात आहे.

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणातही राज्य सरकार कोणाला तरी वाचवायचा प्रयत्न करीत आहे. सुशांतसिंह राजपूत यांची आत्महत्या नसून हत्या आहे. या प्रकरणी पाटण्यामध्ये प्रथमदर्शनी माहिती अहवाल (एफआयआर) दाखल झाला, मात्र मुंबई पोलिसांनी अजुन एफआयआर दाखल केलेला नाही. या प्रकरणाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे. सुशांतसिंहची व्यवस्थापक दिशा हिची हत्या झाल्याचा आरोपही राणे यांनी केला.

दरम्यान, अमृता फडणवीस यांच्या ट्विट मध्ये काहीही चुकीचे नाही. तेव्हा त्यावर कोणाला टीका करण्याचाही अधिकार नाही असेही खासदार राणे यांनी स्पष्ट केले.