चार राज्यातून महाराष्ट्रात विविधमार्गे येणाऱ्या प्रवाशांवर करोना चाचणीचे कठोर निर्बंध राज्य सरकारने घातले आहेत. त्या धास्तीने पर्यटकांनी खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांचे आरक्षण रद्द करण्यास सुरुवात केली आहे. तर अनेकांनी परतण्याचीही घाई केली असून त्याचा परिणाम पर्यटन व्यवसायावरही होऊ लागला आहे.

गोवा, गुजरात, दिल्ली आणि राजस्थानमधून रस्ते मार्गे महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांची सीमेवरच तापमान चाचणी करण्याच्या सूचना आहेत. लक्षणे असणाऱ्यांची प्रतिजन चाचणी केली जाणार असून करोना नसल्याचे स्पष्ट झाल्यावरच त्यांना राज्यात प्रवेश मिळणार आहे. दिवाळीच्या सुट्टीत अनेक जण गोवा, राजस्थान किंवा गुजरात येथे फिरायला गेले आहेत.

नोव्हेंबरच्या मध्यापासून ते डिसेंबर, जानेवारीपर्यंत खासगी प्रवासी प्रवाशांचे प्रमाण वाढलेले असते. करोनामुळे यंदा काहीसे प्रमाण कमी असले तरीही टाळेबंदीचे नियम शिथिल केल्याने खासगी ट्रॅव्हल्सकडे आरक्षण केले जात होते. परंतु बुधवारपासून होणाऱ्या करोना चाचणीच्या धास्तीने अनेकांनी त्याकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे. गुजरात व राजस्थानमधून मुंबई, पुणे, कोल्हापूर व अन्य काही शहरात रोज ३०० बस येतात व तेवढय़ाच जातात. परंतु या गाडय़ांचे जाण्याचे व येण्याचेही साधारण ५० ते ६० टक्के प्रवाशांनी बुधवारपासूनचे आरक्षण रद्द करण्यास सुरुवात केल्याचे मुंबई बस मालक संघटनेचे सचिव हर्ष कोटक यांनी सांगितले. त्यामुळे व्यवसायावर परिणाम होऊ लागला आहे. गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांनीही आरक्षण रद्द केले आहे. २८ व २९ नोव्हेंबपर्यंत मुंबई, पुणे, कोल्हापूरला परतणाऱ्या प्रवाशांनी आधीच्या तारखांचे आरक्षण करण्यास सुरुवात केली आहे.

या महिन्याचा संपूर्ण रोड टॅक्सही भरला आहे. मात्र पाच ते सहा दिवसांत आरक्षण रद्द होत असल्याने सर्वच बाजूंनी उत्पन्न बुडत आहे. त्यामुळे परिवहन आयुक्तांची यासंदर्भात भेट मागितली असून तोडगा काढण्याचे आवाहन केल्याचे कोटक म्हणाले. गेल्या दोन महिन्यात गोवा व राजस्थान येथील पर्यटनास चालना मिळाली होती. देशांतर्गत पर्यटनात या दोन राज्यांना सध्या अधिक मागणी आहे. त्याचवेळी नेमका हा निर्णय आल्यामुळे पर्यटन व्यवसायावर परिणाम होऊ शकतो, असे अनेक पर्यटन कंपन्यांनीही सांगितले.

शासनाचे निर्बंध आले असले तरी सध्या हा व्यवसाय अशावेळी गोंधळ होऊ न देता त्यातून मार्ग काढण्यास सरावला आहे. हॉटेल अथवा अन्य रद्द करण्याचे शुल्क न लावता त्याचा लाभ नंतर घेण्यासाठी यंत्रणा तयार आहोत. सध्या ज्यांनी पर्यटनासाठी नोंदणी केली आहे त्या सहली होतील. आमच्या पर्यटकांच्या चाचणीची जबाबदारी आम्हीच घेतली आहे. त्यामुळे नोंदणी रद्द झाली नाही. मात्र पुढील काळात   निश्चित परिणाम होणार आहे.

– झेलम चौबळ, केसरी टूर्सच्या संचालिका