प्रभाग समिती निवडणूक

मुंबई : राज्य सरकारने पालिकेतील वैधानिक, विशेष आणि प्रभाग समिती अध्यक्षपदांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर भाजप नगरसेवक आक्रमक झाले आहेत. वैधानिक वा विशेष समित्यांमध्ये तुलनेत संख्याबळ कमी असल्याने प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेला धूळ चारण्यासाठी भाजप नगरसेवक व्यूहरचना आखत आहेत.

मुंबई महापालिकेची निवडणूक २०२२ मध्ये होऊ घातली आहे. त्यामुळे आतापासूनच प्रभाग समितीवर वर्चस्व मिळवून छोटी-मोठी कामे करून मतदारांवर छाप पाडता येऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेवर मात करण्याची तयारी भाजप नगरसेवक करीत आहेत.

प्रभाग समित्यांच्या मागील निवडणुकीत नऊ ठिकाणी भाजपला यश मिळाले होते, तर आठ समित्यांवर शिवसेनेला समाधान मानावे लागले होते. यावेळीही अशीच टक्कर देण्याची तयारी भाजप करीत आहे. राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचे सरकार आहे. पण मुंबई महापालिकेत शिवसेना सत्तेवर, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात आहेत. त्यामुळे प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस कोणती भूमिका घेते यावर भाजपचा विजय अवलंबून आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या पारड्यात मते टाकली तर ११ प्रभाग समित्यांवर शिवसेनेला विजय मिळविता येईल. भाजपला पाच समित्यांवर समाधान मानावे लागेल आणि भाजपचा बालेकिल्ला बनलेल्या मुलुंड परिसरातील प्रभाग समितीचे अध्यक्षपद चिठ्ठीद्वारे आजमावे लागेल. पण हे दोन्ही पक्ष तटस्थ राहिले तर भाजपची काही समित्यांवर सरशी होऊ शकेल. या सर्व बाबींची पडताळणी करीत भाजप नगरसेवक व्यूहरचना रचण्यात व्यस्त झाले आहेत.