राज्यात दुष्काळ असताना आयपीएल सामन्यांसाठी मैदानावर हजारो लिटर पाण्याचा वापर केला जात असल्याबाबतचा मुद्दा सोमवारी विधान परिषदेत निघाला. नवी मुंबईतील आसाराम बापूंच्या पाण्याच्या होळीबाबत एकमताने टीका करणाऱ्या सभागृहात सरकारने आयपीएलबाबत मवाळ भूमिका घेतली. पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या ठिकाणी आयपीएल सामना होणार असेल तर तेथे पाण्याच्या वापराबाबत गंभीरपणे विचार करू, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रश्नावर पडदा टाकला.
चंद्रकांत पाटील यांनी आयपीएलमधील पाणीवापराबाबतचा मुद्दा विधान परिषदेत काढला. राज्यात ९ एप्रिल ते १५ मे या कालावधीत आयपीएल सामने होत आहेत. मैदान ओले करण्यासाठी रोज ६० हजार लिटर पाणी खर्च होणार आहे. राज्यात दुष्काळ असताना नवी मुंबईत पाण्याची होळी खेळल्याबद्दल आपण सर्वानी एकमुखाने आसाराम बापूंवर टीका केली. मग आयपीएलच्या सामन्यांवर होणाऱ्या पाण्याच्या उधळपट्टीचे काय असा सवाल पाटील यांनी केला.
त्यावर राज्यात दुष्काळ आहे हे खरे आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे हा चिंतेचा विषय आहे. मुंबईतील आयपीएल सामन्यांसाठी मुंबई महानगरपालिका पाणी देत आहे. त्यासाठी व्यावसायिक दर आकारला जातो व मुंबईत पाण्याची टंचाई नाही. पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या ठिकाणी आयपीएल सामना होणार असेल तर तेथील पाणीवापराबाबत योग्य ती भूमिका घेतली जाईल, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाटील यांचा गुगली कसाबसा तटवला.