नवी मुंबई पोलीस गृहनिर्माण योजना

पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी नवी मुंबईत घरे बांधण्यासाठी सिडकोच्या सर्वसाधारण विकास नियंत्रण नियमावलीतील बदलास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार पोलिसांच्या गृहनिर्माण योजनेसाठी २.५ चटईक्षेत्र (एफएसआय) मिळणार आहे. नगरविकास विभागाने त्यासंबंधीची नुकतीच एक अधिसूचना काढली आहे.

केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच पोलीस दल, महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण महामंडळ, तुरुंग, गृहरक्षक दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, यांच्या करिता नवी मुंबईत कर्मचारी वसाहती बांधण्यासाठी सिडकोच्या विकास नियंत्रण नियमावलीत बदल करण्याचा प्रस्ताव होता. प्रदीर्घ कालावधीनंतर नगररचना संचालकांशी सल्लामसलत करून राज्य सरकारने या प्रस्तावित फेरबदलास मान्यता दिली आहे.

२.५ चटईक्षेत्र: या बदलानुसार नवी मुंबईत राज्य पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी घरे बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अशा गृहनिर्माण योजनांसाठी २.५ एफएसआय मिळणार आहे. सिडकोला त्यासंबंधीचे अधिकार देण्यात आले आहेत. पोलिसांच्या घरांसाठी वाढीव एफएसआय देण्याची यापूर्वी तरतूद नव्हती.  सिडकोच्या विकास नियंत्रण नियमावलीत तसा बदल करून ती तरतूद करण्यात आल्याचे नगरविकास विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.