News Flash

गारपीटग्रस्तांना सरकारचा दिलासा, सुधारित पद्धतीने भरपाई

शेतीपिके, फळपिके आणि शेतजमिनीच्या नुकसान भरपाईची मर्यादा दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत मर्यादित राहणार आहे.

| February 3, 2015 04:49 am

गारपीटग्रस्तांना सरकारचा दिलासा, सुधारित पद्धतीने भरपाई

राज्यात गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेती आणि फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विशेष मदत व सवलती देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवारी घेण्यात आला.
मृत्युमुखी पडलेली व्यक्ती कुटुंबातील कर्ता असल्यास त्याच्या वारसांना एकूण अडीच लाख रूपयांची मदत देण्यात येईल. यातील दीड लाख रूपये शासन आणि एक लाख रूपये मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्यात येतील. इतर व्यक्तींच्या वारसास दीड लाख रूपयांची मदत दिली जाईल.
मृत जनावरांच्या मालकांना मोठ्या जनावरांच्या नुकसानीबाबत एका जनावरासाठी २५ हजार रूपये, दोन मध्यम जनावरांसाठी प्रत्येकी १० हजार रूपये, दोन लहान जनावरांसाठी प्रत्येकी पाच हजार रूपये, चार लहान जनावरांसाठी प्रत्येकी साडेतीन हजार रूपये या प्रमाणात मदत देण्यात येणार आहे.
पडझड झालेल्या घरांच्या मदतीअंतर्गत पूर्णत: उद्ध्वस्त झालेल्या पक्क्या घरासाठी ७० हजार रूपये, पूर्णत: उद्ध्वस्त झालेल्या कच्च्या घरासाठी २५ हजार रूपये, अंशत: (किमान १५ टक्के नुकसान) उद्ध्वस्त झालेल्या घरांसाठी १५ हजार रूपये मदत देण्यात येणार आहे.
पिकांच्या नुकसानीसाठी कोरडवाहू शेतीपिकांसाठी प्रति हेक्टरी दहा हजार, आश्वासित सिंचन क्षेत्राखाली पिकांसाठी प्रति हेक्टरी १५ हजार, बहुवार्षिक पिकांसाठी प्रति हेक्टरी २५ हजार रूपये मदत देण्यात येणार आहे. शेतजमिनीच्या नुकसानीसाठी खरडून गेलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टरी २० हजार रूपये, वाहून गेलेल्या जमिनीसाठी २५ हजार रूपये मदत देण्यात येणार आहे. शेतीपिके, फळपिके आणि शेतजमिनीच्या नुकसान भरपाईची मर्यादा दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत मर्यादित राहणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2015 4:49 am

Web Title: state govt compensation to farmers affected by unseasoned rain
Next Stories
1 मोबाइल बिलावरही कर आकारणी?
2 मुंबईकरांवर नवा करभार
3 किनारी मार्गावरून मेट्रोही धावणार?
Just Now!
X