संदीप आचार्य

सर्वत्र करोनाचे रुग्ण वेगाने वाढत असताना रक्तदानाचा वेग कमालीचा घसरल्यामुळे राज्यात आजघडीला केवळ आठवडाभर पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक राहिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. राज्यातील सर्व रक्तपेढ्यांमध्ये मिळून केवळ २५ हजार रक्ताच्या पिशव्यांचा साठा उपलब्ध आहे, तर मुंबईत केवळ साडेतीन हजार रक्ताच्या पिशव्या रक्तपेढ्यांमध्ये शिल्लक आहेत.

रक्ताचा साठा कमी झाल्याने करोना रुग्णांना रक्तद्रव (प्लाझ्मा) तसेच तसेच विविध शस्त्रक्रियांसाठी रक्त मिळणे कठीण झाले आहे. पहिल्या टप्प्यातील करोनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान वाढावे यासाठी विशेष प्रयत्न केले होते.

आगामी काळातील परिस्थिती लक्षात घेऊन ‘राज्य रक्तसंक्रमण परिषदे’ला विशेष आर्थिक मदत व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची गरज होती. मात्र अर्थसंकल्पात आरोग्य विभागाच्या तोंडाला पाने पुसण्यात आली तसेच रक्तदान कार्यक्रमासाठी कोणतीही विशेष तरतूद करण्यात आली नसल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सरकारच्या या उपेक्षेमुळे ऐच्छिक रक्तदान येत्या काळात मोठ्या प्रमाणात घटेल, असे रक्तदान क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

आर्थिक तरतूद

* २०१७-१८च्या अर्थसंकल्पात राज्य रक्त संक्रमण परिषदेसाठी ४४ कोटी रुपयांची तरतूद केली होती, मात्र प्रत्यक्षात ५.६१ कोटी रुपयेच देण्यात आले.

* २०१८-१९ मध्ये २५ कोटी तरतूद केली तर प्रत्यक्षात १७.५० कोटी रुपये दिले.

* २०१९-२० मध्ये २५ कोटींची तरतूद मात्र प्रत्यक्षात ८ कोटी दिले तर २०२०-२१ मध्ये २० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात दाखवली असून प्रत्यक्षात फारच थोडी रक्कम वितरित केली आहे.

* राज्यात आजघडीला ३४५ रक्तपेढ्या तर मुंबईत ५८ रक्तपेढ्या आहेत.

* गेल्या वर्षी मार्च महिन्यात ५५ हजारांहून जास्त रक्तपिशव्यांचा साठा रक्तपेढ्यांमध्ये होता.

* मुंबईची रक्ताची वार्षिक गरज ही अडीच लाख पिशव्यांची असून महिन्याला २२ हजारांपेक्षा जास्त रक्त पिशव्यांची गरज असते.

* करोनामुळे रक्तदान शिबिरे घेण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

* लसीकरणानंतर २८ दिवस रक्तदान करू नये अशी मार्गदर्शन तत्त्वे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केल्यामुळे रक्तसंकलन करणे हे रक्तपेढ्यांसाठी मोठे आव्हान बनले आहे.

प्रामुख्याने दरवर्षी एप्रिल, मे व जून महिन्यात रक्ताचा तुटवडा जाणवतो. यामागे शाळा कॉलेजना असलेली सुट्टी, लोक सुट्टीनिमित्त बाहेरगावी जाणे आदी अनेक कारणे असतात. गेले वर्षभर बहुतेक खासगी कंपन्यांनीही ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू केल्याचाही मोठा फटका बसला आहे. आम्ही राज्यातील स्वयंसेवी संस्थांना तसेच सर्व रक्तपेढी प्रमुखांनाही रक्तदान शिबिरे घेण्यास सांगितले आहे. यात सर्वात मोठी अडचण आहे ती लसीकरणाची. राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वानुसार दुसऱ्या लसीकरणानंतर किमान २८ दिवस रक्तदान करू नये असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे लसीकरणापूर्वी एकदा रक्तदान करा असे आवाहन आम्ही करत आहोत.

–  डॉ. अरुण थोरात, ‘राज्य रक्त संक्रमण परिषद’ प्रमुख