राज्यात ‘पुन्हा नव्याने सुरुवात’ या अभियानांतर्गत निवास व्यवस्था असलेली हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस बुधवारपासून सुरू करण्याचा निर्णय सोमवारी राज्य सरकारने घेतला.

करोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील हॉटेल, लॉज यांना अंतरनियम पालन आणि क्षमतेच्या ३३ टक्के  क्षेत्राच्या वापराची अट घालून परवानगी देण्यात आली आहे. उपाहारगृहांचा वापरही केवळ निवासी ग्राहकांसाठीच करता येईल.

गेले तीन महिने हॉटेल- उपाहारगृहे बंद आहेत. परिणामी, त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, हजारोंच्या रोजगारावर गदा आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून संवाद साधला होता. उपाहारगृहे आणि मोठय़ा हॉटेलांमध्ये बसून खाद्यपदार्थाचा आस्वाद घेणे शक्य होईल, या दृष्टीने कार्यपद्धती तयार करण्यात येत असून, ती निश्चित झाल्यावर हॉटेल, उपाहारगृहे सुरू करण्यास परवानगी दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली होती. त्यानंतर सरकारने लगेच निवासाची व्यवस्था असलेली हॉटेल, गेस्ट हाऊस तसेच लॉज पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला.

मुंबई महानगर प्रदेशासह पुणे, सोलापूर,औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूरमधील करोना प्रतिबंधित क्षेत्रातील तसेच तसेच ‘शॉपिंग मॉल’मधील हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस मात्र बंदच राहणार आहेत. मुख्य सचिव संजय कु मार यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

निवासाची व्यवस्था असलेल्या हॉटेलमधील एकूण क्षमतेच्या ३३टक्के क्षेत्राचा वापर करण्यास परवानगी देण्यात आली आहे. उर्वरित क्षेत्राचा वापर अलगीकरणासाठी करण्याची मुभा जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांना देण्यात आली आहे. शहरातील परिस्थितीनुसार हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस सुरू करू द्यायची की नाहीत याचे निर्णय घेण्याचे अधिकारही जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत.

करोना प्रतिबंधक उपाययोजना, खबरदारी याची सविस्तर माहिती दर्शनी भागावर प्रसिद्ध करणे हॉटेलांना बंधनकारक आहे. प्रवेशद्वारावरच ग्राहकांची तापमान तपासणी करावी. स्वागत कक्षात सुरक्षा काचेचा वापर करावा. स्वागत कक्ष, प्रतीक्षा कक्ष, अतिथीगृहात सॅनिटायझर ठेवावे, हॉटेल कर्मचारी तसेच ग्राहक यांना मुखपट्टी, हातमोजे यांचा वापर बंधनकारक आहे. आजाराची लक्षणे नसलेल्या ग्राहकांनाच प्रवेश देण्यात येईल. मुखपट्टीचा वापर, आरोग्यसेतू अ‍ॅप बंधनकारक आहे.

उपाहारगृहांनाही मुभा देण्याची मागणी

उपाहारगृहांमधून घरपोच खाद्यपदार्थाची सेवा देण्यास यापूर्वीच परवानगी देण्यात आली. मात्र, उपाहारगृहांमध्ये बसून खाद्यपदार्थ सेवन करण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे हॉटेल्सप्रमाणेच उपाहारगृहांना परवानगी देण्याची मागणी ‘आहार’ या संघटनेने केली आहे.