राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे असणाऱ्या पर्यावरण विभागाच्या नावात बदल करण्यात आला आहे. पर्यावरण विभागाच्या नावात बदल करुन ते आता ‘पर्यावरणीय व वातावरणीय विभाग’ असे करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आदित्य ठाकरे यांनी याबद्दल मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “महाराष्ट्र मंत्रिमंडळातील पर्यावरण खात्याचे नाव, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग असे करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याबद्दल मी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार मानतो. यामुळे वातावरणातील बदलांशी निगडित कामे पार पाडण्यासाठी सुद्धा हा विभाग कार्यरत होणार आहे”.

आणखी वाचा- आदित्य ठाकरे यांच्या खात्याचं नाव बदललं

शुक्रवारी जागतिक पर्यावरण दिनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री समजंय बनसोडे यांनी नावात बदल करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. फक्त त्यासाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेची गरज होती. त्यानुसार ही मान्यता देण्यात आली आहे.

आदित्य ठाकरे यांनी सांगितलं होतं की, लवकरच राज्य मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर पर्यावरण विभाग पर्यावरणीय व वातावरणीय विभाग या नावाने ओळखलं जाईल. पर्यावरणीय व वातावरणीय विभाग पृथ्वी, हवा, पाणी, अग्नी आणि आकाश या पंचतत्त्वावर काम करेल असंही सांगितलं होतं.