ग्रीनपीस इंडिया संस्थेचा अहवाल

नागपूर, मुंबई : भारतातील २८७ शहरांपैकी २३१ शहरे हवा गुणवत्तेच्या बाबतीत धोक्याच्या पातळीत आली असून महाराष्ट्रातील २० शहरांचा यात समावेश आहे. मुंबई हे राज्यातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून गणले गेले आहे. मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा राष्ट्रीय गुणवत्ता निर्देशांकापेक्षा तीनपटीने खालावला आहे. मुंबईच्या हवेच्या प्रदूषणात मुख्यत: पीएम १० घटकांचे वाढते प्रमाण कारणीभूत आहे. ग्रीनपीस इंडिया या पर्यावरण संस्थेच्या वतीने दरवर्षी एक पर्यावरणीय अहवाल सादर केला जातो. या वर्षीच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.

हवेतील अतिसूक्ष्म कणांबाबत (पीएम १०) मुंबई शहर सर्वाधिक प्रदूषित ठरले आहे. या शहरातील हवेची गुणवत्ता जागतिक आरोग्य संघटनेच्या हवा प्रदूषणाबाबत असलेल्या मानकापेक्षा आठपट अधिक आहे. मुंबईच्या हवेच्या प्रदूषणात मुख्यत: पीएम १० घटकांचे वाढते प्रमाण कारणीभूत असल्याचे ग्रीनपीसच्या अधिकाऱ्याने सांगितले.  मुंबईतील वाढती वाहतूक, वाढती लोकसंख्या, उद्योगधंदे आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांच्या बांधकामामुळे प्रदूषणाच्या पातळीत वाढ होत असल्याचे दिसून येते. सुमारे वर्षभरापूर्वी राज्यातील हवेच्या प्रदूषणाच्या अहवालातदेखील मुंबईतील हवेत पीएम घटक आणि नायट्रोजन ऑक्सॉईडच्या उत्सर्जनात वाढ झाल्याचे स्पष्टपणे आढळून आले होते.

जानेवारी २०१९ मध्ये भारतासाठी पहिला राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. याअंतर्गत २०१७ पासून २०२४ पर्यंत शहरातील वायू प्रदूषणाचे प्रमाण २० ते ३० टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या प्रत्येक शहरासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. ग्रीनपीसच्या अहवालात असेही म्हटले आहे की, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने केवळ १२२ सर्वाधिक प्रदूषित शहरे ओळखली आहेत. ही १२२ शहरे २८ राज्ये आणि नऊ केंद्रशासित प्रदेशांतील आहेत. त्यातील १६६ शहरांनी राष्ट्रीय हवा गुणवत्ता मानकाची मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे या शहरांचाही समावेश सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत करावा.

२० शहरे अतिप्रदूषित

  • हवेतील अतिसूक्ष्म कणांबाबत(पीएम१०) मुंबई शहर सर्वाधिक प्रदूषित ठरले आहे.
  • डोंबिवली, चंद्रपूर, उल्हासनगर, ठाणे, पुणे, अमरावती, नागपूर, जालना, लातूर, कोल्हापूर, पिंपरी, चिंचवड, नाशिक, सांगली, जळगाव, अकोला, सोलापूर, नवी मुंबई, औरंगाबाद आणि भिवंडी येथील हवेची गुणवत्ता राष्ट्रीय हवा गुणवत्ता मानकापेक्षा व जागतिक आरोग्य संघटनेच्या मापदंडापेक्षा आठपट अधिक आहे.
  • ग्रीनपिसच्या अभ्यासानुसार, डोंबिवली, ठाणे, पिंपरी, चिंचवड, नवी मुंबई आणि भिवंडी ही शहरे नव्याने मानकापेक्षा अधिक हवा प्रदूषित शहरांच्या यादीत आली आहेत.