करोना कृतिदलातील बालरोगतज्ज्ञांचा रविवारी राज्यभरातील डॉक्टरांशी संवाद

मुंबई : करोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये बालकांना अधिक धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणांना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने कठोर पावले उचलली असून करोना कृतिदलातील बालरोगतज्ज्ञ रविवारी, २३ मे रोजी राज्यभरातील डॉक्टरांशी याबाबत चर्चा करणार आहेत.

करोनाबाधित बालकांवरील उपचारासाठी काय तयारी असावी याचे मार्गदर्शन राज्यातील सर्व डॉक्टरांना रविवारी करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या ‘माझा डॉक्टर’ या संकल्पनेअंतर्गत या वेब-चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

गृहविलगीकरणातील करोनाबाधितांवर उपचार कसे करावेत याचे मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या ‘माझा डॉक्टर’ संकल्पनेअंतर्गत वेबसंवादाचे आयोजन केले होते. यात करोना कृतिदलाने डॉक्टरांना मार्गदर्शन केले. याला मिळालेला प्रतिसाद पाहून मुख्यमंत्र्यांनी बालकांवरील उपचाराच्या तयारीच्या अनुषंगानेही वेबसंवाद आयोजित करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार येत्या रविवारी बालरोगतज्ज्ञांकडून राज्यभरातील डॉक्टरांना मार्गदर्शन केले जाणार असून याला मुख्यमंत्रीदेखील उपस्थित असणार आहेत.

‘मुंबईतील मोठ्या रुग्णालयांप्रमाणे बालरुग्णांसाठीही अशी रचना करता येईल का, डॉक्टरांचे प्रशिक्षण कसे करावे याबाबतही चर्चा करण्यात येईल. कृतिदलातील तीन डॉक्टर मार्गदर्शन करणार असून त्यानंतर डॉक्टरांच्या प्रश्नोत्तरांचेही निरसन केले जाईल. पूर्वतयारीच्या अनुषंगाने हे नक्कीच फायदेशीर असेल, असे कृतिदलाचे प्रमुख डॉ. सुहास प्रभू यांनी सांगितले.

बाधितांपैकी ४ ते ५ टक्के बालकांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज

तिसऱ्या लाटेमध्ये बालकांना धोका असला तरी एकूण रुग्णांपैकी ४ ते ५ टक्के बालकांनाच रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासू शकते. परंतु हे प्रमाण टक्क्यांमध्ये आहे. त्यामुळे प्रत्यक्षात आकड्यांमध्ये संख्या अधिक असू शकते, असेही डॉ. प्रभू यांनी स्पष्ट केले.

 

कृतिदल…

पूर्वतयारी म्हणून यासाठी बालरोगतज्ज्ञांचे करोना कृतिदल तयार करण्यात आले आहे. दहा बालरोगतज्ज्ञांचा समावेश असलेल्या या दलाच्या अध्यक्षपदी पी.डी. हिंदुजा रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. सुहास प्रभू यांची निवड केली आहे.

 

उपचारांची दिशा…

बालकांच्या उपचारासाठी जिल्ह्यांमध्ये रचना कशी असावी, किती खाटा आवश्यक असतील. तसेच इतर आवश्यक सामग्रीची माहिती यावेळी देण्यात येईल. तसेच अतिदक्षता विभाग आणि खाटा यांची आवश्यकता, बालकांच्या उपचारासाठी आवश्यक औषधे यासह उपचारांची दिशा काय असेल याबाबत सात ते आठ हजार डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यात येईल.

देशभरात चिंताजनक स्थिती… गेल्या दोन महिन्यांमध्ये कर्नाटकमध्ये ९ वर्षांखालील ४० हजार मुले करोनाबाधित झाली. तसेच वर्षभरात ४३ लहान मुलांचा मृत्यू झाला. दिल्लीमध्ये दोन महिन्यांत २९ करोनाबाधित बालकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. करोनाच्या पहिल्या लाटेत बालके विषाणूपासून सुरक्षित होती. मात्र दुसऱ्या लाटेमध्ये बालकांनाही त्रास जाणवत आहे.