२०१४ ची नाटके सादर करण्यास निर्मात्यांचा आक्षेप
सांस्कृतिक कार्यसंचालनालयातर्फे २०१५ या वर्षांसाठी आयोजित करण्यात आलेल्या २८व्या राज्य नाटय़ व्यावसायिक स्पर्धेत २०१४ मध्ये निर्मिती झालेल्या नाटकांना प्रवेश देण्यात येणार असल्याने ही स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. अकरा व्यावसायिक नाटय़ निर्मात्यांनी याला आक्षेप घेतला असून या निर्मात्यांचे एक शिष्टमंडळ लवकरच सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांची भेट घेणार असल्याचे समजते. मात्र राज्य शासनाने केलेल्या नियमानुसारच ही स्पर्धा घेण्यात येत असल्याचे सांगून याबाबत घेण्यात आलेले आक्षेप सांस्कृतिक कार्यसंचालयाने फेटाळले आहेत.
निर्माते अजित भुरे यांनी सांगितले, २०१५ या वर्षांसाठी होणाऱ्या स्पर्धेत २०१४ मध्ये निर्मिती असलेली नाटके सादर करणे अयोग्य आहे. ही स्पर्धा १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१५ या कालावधीत निर्मिती झालेल्या नाटकांसाठीच असावी. २०१४ मधील स्पर्धा रद्द झाल्याने त्या वर्षांत निर्मिती झालेल्या ज्या नाटकांचे पाच प्रयोग २०१५ मध्ये सादर झाले असतील त्यांना स्पर्धेत सहभागी होता येईल, अशी दुरुस्ती करण्यात आली आहे. मात्र जे निर्माते पाच प्रयोग करू शकले नाहीत त्यांच्यावर यामुळे अन्याय होणार आहे. दरम्यान, अकरा व्यावसायिक नाटय़ निर्मात्यांनीही एकत्र येऊन एक निवेदन तयार केले आहे. २८व्या राज्य नाटय़ व्यावसायिक स्पर्धेत २०१५ या वर्षांत निर्मिती झालेल्या नाटकांचाच समावेश करण्यात यावा, तसेच ६ फेब्रुवारी २०१६ रोजी घेतलेला निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. २८व्या राज्य नाटय़ व्यावसायिक स्पर्धेसाठी प्रवेश अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २९ फेब्रुवारी २०१६ अशी होती.

विशिष्ट कालावधीत नाटय़निर्मिती झालेल्या नाटय़कृतीच स्पर्धेत भाग घेऊ शकतील, अशी अट पूर्वीच्या कोणत्याही नियमात नव्हती. पूर्वी अशी अट होती आणि आता ती रद्द करण्यात आली आहे, असा काही नाटय़निर्मात्यांचा झालेला समज चुकीचा आहे. ६ फेब्रुवारी २०१६ रोजी घेतलेल्या शासननिर्णयानुसार स्पर्धा विशिष्ट कालावधीत निर्मिती झालेल्या नाटकांसाठी नव्हे, तर ज्या वर्षांसाठी घेण्यात येत आहे त्या वर्षांत किमान पाच प्रयोग सादर झालेल्या नाटय़कृतींसाठी आहे. नाटय़निर्मिती केव्हाही झालेली असेल आणि ती नाटय़कृती यापूर्वीच्या स्पर्धेत सहभागी झालेली नसेल तर ते नाटक अन्य नियमांच्या अधीन राहून त्या वर्षीच्या (म्हणजे आता २०१५च्या) स्पर्धेत सहभागी होऊ शकते. हा बदल निर्माता संघाशी चर्चा करूनच करण्यात आला आहे.
-अजय आंबेकर, सांस्कृतिक कार्यसंचालक