करोनाची साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीला लोकांकड़ून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आता अत्यावश्यक सेवेवरही काही निर्बंध लागू करण्याच्या हालचाली सरकारच्या पातळीवर सुरू झाल्या आहेत. त्यानुसार किराणा मालाची दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचा निर्णय सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

गर्दी टाळण्याकरिताच दूध, भाजीपाला दुकानांवरही निर्बंध लागू करण्याबाबत विचार सुरू झाला आहे.

राज्यात करोना नियंत्रणासाठी टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र लोकांना त्रास होऊ नये यासाठी अत्यावश्यक सेवेसह सार्वजनिक वाहतूक वगळण्यात आली आहे. या टाळेबंदीला लोकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. दुसरीकडे रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. टाळेबंदीला लोक प्रतिसाद देत नसून रस्ते, दुकाने, भाजी मंडईत लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने आता अखेरचा पर्याय म्हणून पुन्हा एकदा कडक टाळेबंदी लागू करण्याबाबत सरकारमध्ये विचार सुरू झाला आहे.

त्यानुसार निर्बंध लागू असतानाही किराणा खरेदीच्या नावावर नागरिक दिवसभर बाहेर फिरत असल्याने किराणा दुकानांची वेळ सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. अर्थात, सरकारने अद्याप अधिकृत आदेश लागू के लेला नाही. त्यानुसार येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.  किराणाच्या नावाखाली विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना पायबंद घालण्यासाठी किराणा दुकाने सकाळी ११ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याबाबत प्रस्ताव असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

कडक टाळेबंदीबाबत मुख्यमंत्री दोन दिवसांत निर्णय घेतील. गरज पडली तर कालावधी वाढू शकेल असे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

रस्त्यावरील गर्दी कमी करण्याकरिता रस्ते वाहतुकीतही नियमन करण्याचे सूतोवाच परिवहनमंत्री अनिल परब यांनी केले. यानुसार जिल्हाअंतर्गत प्रवासावर निर्बंध येऊ शकतात.