मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर झालेल्या दमदार पावसामुळे राज्यात सरासरीपेक्षा ३० टक्क्य़ांनी अधिक पाऊस झाला असला तरी मराठवाडय़ात मात्र सरासरीपेक्षा १८ टक्क्य़ांनी कमीच आहे. हवामान खात्याच्या नोंदीनुसार राज्यातील नऊ जिल्ह्य़ांमध्ये सरासरीपेक्षा पाऊस कमी, तर आठ जिल्ह्य़ांत सरासरीपेक्षा खूप अधिक पाऊस झाला. सोलापूर, उस्मानबाद, लातूर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्य़ांत सरासरीपेक्षा कमी पाऊस नोंदवण्यात आला. सोलापूर जिल्ह्य़ात सरासरीपेक्षा ५४ टक्के कमी, तर बीड आणि यवतमाळमध्ये सरासरीपेक्षा ३३ टक्के कमी पाऊस झाला.

राज्यात पुणे जिल्ह्य़ात सरासरीपेक्षा सर्वाधिक म्हणजे ११६ टक्के अधिक पावसाची नोंद झाली. कोल्हापूर, सातारा, पुणे, ठाणे, पालघर, मुंबई, नाशिक आणि धुळे या आठ जिल्ह्य़ांत सरासरीपेक्षा ६० टक्क्य़ांहून अधिक पाऊस पडला. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, जळगाव आणि गडचिरोली जिल्ह्य़ांत सरासरीपेक्षा २० ते ५९ टक्के अधिक पाऊस झाला. उर्वरित महाराष्ट्राने पावसाची सरासरी गाठली.

पावसाच्या दीर्घकालीन पूर्वानुमानानुसार १९ सप्टेंबपर्यंत किनारपट्टी, उत्तर मध्य महाराष्ट्र, घाटमाथा, विदर्भ या परिसरात पावसाचे प्रमाण चांगले राहणार आहे. त्यानंतरच्या आठवडय़ात २६ सप्टेंबपर्यंत किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर पावसाची शक्यता आहे, तर उर्वरित महाराष्ट्रात पाऊस पडू शकतो. त्यानंतरच्या दोन्ही आठवडय़ात १० ऑक्टोबपर्यंत पाऊस कमी झालेला असेल. केवळ मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता असून इतर ठिकाणी हलका ते किरकोळ पाऊस अपेक्षित आहे. त्याच दरम्यान उत्तर भारतातूनदेखील पाऊस संपण्याची शक्यता आहे.