या वर्षीच्या मोसमात राज्यात सरासरीपेक्षा ३२ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली, तर मराठवाडय़ात सरासरीपेक्षा १३ टक्क्यांहून कमी पाऊस पडला.

सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, वाशीम आणि हिंगोली या सहा जिल्ह्य़ांमध्ये पावसाला सरासरी गाठता आली नाही. मुंबई शहर, ठाणे, पालघर, पुणे, कोल्हापूर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या आठ जिल्ह्य़ांत सरासरीपेक्षा ६० टक्क्यांहून अधिक नोंद झाली. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, जळगाव, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्य़ांत सरासरीपेक्षा २० ते ५९ टक्क्यांहून अधिक  नोंद झाली. तर उर्वरित महाराष्ट्रात पावसाने सरासरी गाठली. सोलापूर जिल्ह्य़ात सरासरीपेक्षा सर्वात कमी म्हणजेच ५० टक्के कमी पाऊस झाला. तर राज्यात सरासरीपेक्षा सर्वाधिक पाऊस म्हणजे ११३ टक्के अधिक पुणे जिल्ह्य़ात पडला.

पावसाच्या दीर्घकालीन पूर्वानुमानानुसार २६ सप्टेंबपर्यंत किनारपट्टीवर अतिमुसळधार, तर मराठवाडा वगळता उर्वरित राज्यात मुसळधार पाऊस पडू शकतो.  ३० सप्टेंबपर्यंत मराठवाडा आणि विदर्भात तुरळक, तर उर्वरित महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यानंतरच्या पंधरवडय़ात मध्य महाराष्ट्र वगळता राज्यभरात अगदीच तुरळक प्रमाणात पाऊस पडू शकतो. दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रविवारी २२ सप्टेंबरला राज्यभरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.