‘राज्य संस्कृत नाटय़स्पर्धे’ला नाटय़गृहाऐवजी सामान्य सभागृह दिल्याने स्पर्धकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटू लागला होता. ही बाब ‘लोकसत्ता’ने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ही स्पर्धा दादर येथील शिवाजी नाटय़ मंदिरात घेण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य संचालनालयाने घेतला आहे. या निर्णयानंतर स्पर्धक संघांनी आनंदाची भावना व्यक्त केली.

शासनाने ५९व्या संस्कृत नाटय़ स्पर्धेसाठी नाटय़गृहाऐवजी मुलुंड येथील ‘महाराष्ट्र सेवा संघ’ या साधारण सभागृहाची निवड केली होती. परंतु या सभागृहात पूरक सोयी नसल्याने नाटकाचे सादरीकरण कसे करायचे, असा प्रश्न स्पर्धक संघांना पडला होता. स्पर्धकांच्या मते प्रकाश, ध्वनी आणि सभागृहातील व्यवस्थापनाच्या त्रुटी यांमुळे या सभागृहात सादरीकरण करणे कठीण होते. या घटनेचा आढावा घेणारे वृत्त शनिवार, १८ जानेवारी रोजी ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले. त्यानंतर कलाकारांच्या गैरसोयीचा अंदाज घेऊ न सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चौरे यांनी तातडीने स्पर्धेचे स्थळ बदलण्याचा निर्णय घेतला.

आता ही स्पर्धा दादर येथील शिवाजी नाटय़ मंदिर येथे होणार आहे. शिवाय स्थळ जरी बदलले असले तरी स्पर्धेच्या तारखा मात्र त्याच राहतील, असेही संचालनालयाने स्पष्ट केले. आता २३ आणि २४ जानेवारीला ही स्पर्धा शिवाजी नाटय़ मंदिरात रंगणार असल्याने स्पर्धकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

स्पर्धकांनी मानले आभार..

महाराष्ट्र सेवा संघात सादरीकरण करताना अनेक अडचणींना जामोरे जावे लागले असते. स्पर्धेचा प्रयोग कसा होईल, कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागेल, असे अनेक प्रश्न समोर होते. परंतु सांस्कृतिक कार्य संचालनालयाने या गोष्टीची तातडीने दाखल घेऊ न शिवाजी मंदिरसारखे प्रशस्त नाटय़गृह स्पर्धेसाठी निवडले त्याबद्दल शासनाचे आणि ‘लोकसत्ता’चे आभार, अशी प्रतिक्रिया स्पर्धकांनी दिली.