News Flash

..तर राज्याने इंधनावरील कर कमी करावेत!

देवेंद्र फडणवीस यांचे सत्ताधाऱ्यांना आव्हान

Devendra-Fadanvis-1
(संग्रहित छायाचित्र)

इंधनावर केंद्रापेक्षा राज्य सरकारचेच कर अधिक असून हिंमत असेल, तर महाविकास आघाडी सरकारने आपले कर कमी करून जनतेला दिलासा द्यावा, असे आव्हान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सत्ताधाऱ्यांना दिले. देशाच्या घटनेनुसार राज्याचे प्रमुख असलेल्या राज्यपालांविषयी धमक्यांची भाषा वापरताना कोणती नीतिमत्ता आघाडी सरकारचे  नेते दाखवीत आहेत, असा सवाल फडणवीस यांनी केला.

पेट्रोल, डिझेलसह इंधनाचे दर गेले काही दिवस  वाढत असून ते कमी करण्याची मागणी जनतेकडून होत आहे. यासंदर्भात विचारता फडणवीस म्हणाले, राज्य सरकारच्या मूल्यवर्धित करांसह अन्य करांचे प्रमाण अधिक आहे. भाजप सरकारच्या कार्यकाळात इंधनाचे दर वाढले होते, तेव्हा आम्ही राज्याचे कर कमी करून प्रति लिटर पाच रुपयांप्रमाणे पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले व जनतेला दिलासा दिला होता. महाविकास आघाडी सरकारनेही केंद्र सरकारकडे बोटे न दाखविता स्वत:च्या हिमतीवर करकपातीचा निर्णय घ्यावा.

नियमानुसार तक्रार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नीच्या नावे कोर्लई (जि. रायगड) येथील जमीनप्रकरणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अनेक आरोप व तक्रारी केल्या आहेत व आंदोलन करीत आहेत, मात्र भाजपचे अन्य नेते शांत आहेत, यासंदर्भात विचारता फडणवीस म्हणाले, त्यांनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयापुढे केलेल्या आंदोलनात भाजप कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. सोमय्या यांना भाजपचेच पाठबळ आहे.

महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद

रस्ते, सिंचन, रेल्वे मार्ग, मेट्रो अशा पायाभूत सुविधांसह राज्यातील सिंचन व अन्य प्रकल्पांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आली असून केंद्र सरकारने राज्यासाठी तीन लाख, पाच हजार, ६११ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. याबाबत राज्यातील सत्ताधाऱ्यांचा आरोप चुकीचा  असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2021 12:01 am

Web Title: state should reduce fuel tax devendra fadnavis abn 97
Next Stories
1 ‘ऑनलाइन परीक्षा आणि पन्नास टक्के गुणांचे अंतर्गत मूल्यमापन हवे’
2 जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षकांना डिसले गुरुजींचे धडे
3 खूशखबर! म्हाडाच्या ७५०० घरांची लॉटरी; जितेंद्र आव्हाड यांनी केली घोषणा
Just Now!
X