करोना लसीकरण मोहिमेचा वेग वाढविण्यासाठी वेळेची मुदत काढून टाकत लसीकरण केंद्र २४ तास खुले ठेवण्यास केंद्रीय आरोग्य विभागाने मुभा दिली असली तरी राज्याने मात्र याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे तूर्तास तरी राज्यात हा नियम लागू  होण्याची शक्यता नाही.

उपलब्ध मनुष्यबळामध्ये २४ तास लसीकरण करणे शक्य आहे का आणि योग्यरित्या अ‍ॅप सुरू केल्यास याची गरज आहे का अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत.

करोनाबाधितांची संख्या पुन्हा झपाटय़ाने वाढत असल्याने लसीकरण वेगाने करण्यासाठी दबाव वाढत आहे. त्यामुळे आता लसीकरणासाठी नऊ ते पाच वेळची अट केंद्रीय आरोग्य विभागाने काढून टाकली आहे. ‘देशाचे नागरिक त्यांच्या सोयीनुसार जवळच्या केंद्रात २४ तासांत केव्हाही जाऊन लस घेऊ शकतात. मात्र, राज्यात अद्याप याबाबत काही निर्णय घेण्यात आला नसल्याचे राज्याचे लसीकरण विभागाचे प्रमुख डॉ. दिलीप पाटील यांनी स्पष्ट केले.

मनुष्यबळ कसे पुरवायचे

राज्यात सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्याही एकीकडे वाढत आहे. त्यामुळे तेथे मनुष्यबळाची अधिक गरज भासत आहे. त्यात २४ तास लसीकरण सुरू ठेवण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करणे शक्य नाही, त्याची आवश्यकताही नाही, असे मत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.  नऊचे लसीकरण असले तरी आमचे कर्मचारी सातपासून कामाला लागलेले असतात. पाच वाजता लसीकरण संपले तरी नंतर अहवाल तयार करणे, लशींच्या साठय़ाची माहिती अद्ययावत करणे यासाठी पुढील दोन तास काम करतात.

संकेतस्थळ, अ‍ॅपमध्ये त्रुटी

२४ तास लसीकरण सुरू ठेवायलाही अत्यावश्यक सेवा नाही. नोंदणीचे संकेतस्थळ सुरळीत सुरू केले तर केंद्रांना लसीकरण वेगाने करता येऊ शकेल, तेव्हा मुळात ज्याची गरज आहे त्यावर काम करणे गरजेचे असल्याचे लसीकरण केंद्रावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मांडले.

राज्यांना अधिकार द्यावेत

लसीकरण एककेंद्री ठेवण्याच्या केंद्रीय आरोग्य विभागाच्या अट्टाहासाचे परिणाम गेले महिनाभर स्थानिक आरोग्य प्रशासनाला भोगावे लागत आहे. लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी रुग्णालयांची, कक्षांची संख्या वाढवण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. केंद्राने आता खासगी रुग्णालयांना परवानगी दिली.  हे लसीकरण करण्याचे सर्व अधिकारही राज्यांना द्यावेत, असे राज्याचे करोना संबंधीचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी व्यक्त केले.

केंद्रीय आरोग्य विभागाकडून याबाबत कोणतीही माहिती अद्याप आलेली नाही. त्यामुळे सध्या तरी याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. दोन सत्रांमध्ये लसीकरण करण्याची मुभा देण्याची मागणी आम्ही महिनाभरापासून करत आहोत. परंतु याला केंद्राने प्रत्युत्तर दिले नाही. आता यासंबंधी काही आदेश आले तर परिस्थितीची विचार करून सकाळी सात ते संध्याकाळी सात असे दोन सत्रांमध्ये लसीकरण करण्याचा विचार केला जाईल.

– डॉ. मंगला गोमारे, मुंबई पालिकेच्या कार्यकारी आरोग्य    अधिकारी