गतवर्षी वर्धापनदिन साजरा करताना पक्षाच्या अस्तित्वाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. यंदाच्या वर्धापनदिनाला राज्याच्या राजकारणाची सारी सूत्रे राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. वर्षभरात पक्षाचा आलेख एकदमच उंचावला. सत्तेच्या माध्यमातून राज्यात पक्षाचा पाया अधिक प्रभावीपणे विस्ताराण्यावर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी भर दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला बुधवारी २१ वर्षे पूर्ण होत आहेत. करोनाच्या संकटामुळे पक्षाच्या वतीने वर्धापन दिनाचा कार्यक्र म मोठय़ा प्रमाणावर साजरा केला जाणार नाही. स्थानिक पातळीवर रक्तदान व अन्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार हे निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणाच्या दौऱ्यावर असून, उद्या ते रत्नागिरी जिल्ह्य़ातील नुकसानीचा आढावा घेणार आहेत.

पक्षाच्या स्थापनेपासून सत्ता हे समीकरण सतत १५ वर्षे होते. पाच वर्षांच्या खंडानंतर राष्ट्रवादी पुन्हा राज्याच्या सत्तेत परतला. २२व्या वर्षांत पदार्पण करीत असताना जवळपास पावणे सोळा वर्षे पक्ष सत्तेत आहे. लोकशाही आघाडी किंवा आता महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपद मिळाले नसले तरी गृह, वित्त, जलसंपदासारखी महत्वाची खाती पक्षाने भूषविली. सत्तेच्या माध्यमातून राष्ट्रवादीने बस्तान बसविण्याचा प्रयत्न केला. परंतु मुंबई आणि विदर्भ या राज्यातील विधानसभेच्या ९८ जागा असलेल्या या दोन विभागांमध्ये पक्षाला अद्यापही बाळसे धरता आलेले नाही.

काँग्रेसपासून शरद पवार यांनी फारकत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हा राज्यात काँग्रेसचा प्रभाव ओसरून राष्ट्रवादी ही जागा घेईल, असा अंदाज वर्तविला जात होता. काँग्रेसची जागा आता राष्ट्रवादी घेईल, असा तेव्हा दावाही राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात होता. १९९९ आणि २०१४ मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढले तेव्हा काँग्रेसचे जास्त आमदार निवडून आले. २००४ आणि २००९ मध्ये आघाडीत काँग्रेसचे संख्याबळ जास्त होते. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने काँग्रेसला मागे टाकले. राष्ट्रवादीचे ५४ तर काँग्रेसचे ४४ आमदार निवडून आले. काँग्रेसची जागा घेण्याचे राष्ट्रवादीचे स्वप्न गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत साकार झाले.

महाविकास आघाडीची मोट बांधण्यात शरद पवार यांनी पुढाकार घेतला. शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येणे कठीण होते. परंतु शरद पवार यांनी काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांचे यासाठी मन वळविले. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याकरिता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पटवून दिले. शिवसेनेबरोबर हातमिळवणी करण्यास काँग्रेसमध्ये सक्त विरोध होता. पवारांमुळेच महाविकास आघाडीचा प्रयोग प्रत्यक्षात येऊ शकला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये गृह, वित्त, जलसंपदा, उत्पादन शुल्क, आरोग्य अशी सारी महत्वाची खाती राष्ट्रवादीकडे आहेत. सरकारवर शरद पवार यांचा रिमोट असल्याची चर्चा नेहमीच होते. टाळेबंदीच्या काळात निर्बंध शिथिल करण्याकरिता पवारांनीच पुढाकार घेतला. राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये खटके उडू लागताच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात तक्रार पवारांनीच केली होती.

अखेर ते घडलेच

राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणात सुरुवातीपासूनच अनेक हेवेदावे झाले. मग कधी छगन भुजबळ विरुद्ध सारे नेते, आर. आर. पाटील विरुद्ध जयंत पाटील, गणेश नाईक विरुद्ध वसंत डावखरे, हसन मुश्रीफ विरुद्ध सदाशिव मंडलिक आदी. शरद पवार यांचा राजकीय उत्तराधिकारी अजित पवार की सुप्रिया सुळे ही चर्चाही नेहमी सुरू असते. अजित पवार हे नेतृत्वाच्या विरोधात आक्र मक झालेले बघायला मिळाले. गेल्या नोव्हेंबर महिन्यात अजित पवार यांनी थेट शरद पवार यांनाच आव्हान दिले. काही आमदारांच्या मदतीने भाजपशी हातमिळवणी केली. अजितदादांचे बंड शरद पवार यांनी मोडून काढले. कधी ना कधी हे होणारच होते व ते घडले. पण त्यातही काकाने पुतण्यावर मात केली.