बारावीचा अर्धा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवून झाल्यानंतर कसे शिकवायचे, परीक्षा पद्धत कशी असेल, याबाबत राज्यमंडळाने शिक्षकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे.

बारावीची पाठय़पुस्तके आणि परीक्षा पद्धत यंदा बदलली आहे. नव्या अभ्यासक्रमाचे महाविद्यालये सुरू होण्यापूर्वी प्रशिक्षण होणे अपेक्षित असते. यंदा करोनाच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वेळापत्रक विस्कळीत झाले. मात्र, तरीही बहुतेक कनिष्ठ महाविद्यालयांनी जुलैमध्येच ऑनलाइन वर्ग सुरू केले. अध्यापन सुरू होऊन चार महिने झाल्यानंतर राज्यमंडळाला शिक्षकांच्या प्रशिक्षणाबाबत जाग आली.

दरम्यान शिक्षण विभागाने

वार्षिक वेळापत्रक दिले नाही. त्यामुळे अनेक कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर परीक्षांचेही आयोजन केले आहे. आता मंडळाचे प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन चाचण्या एका वेळी येत असल्याची शिक्षकांची तक्रार आहे.

अडीच तासांत प्रशिक्षण..

पुस्तकांमध्ये अनेक बदल आहेत. विद्यार्थी कृतीच्या माध्यमातून शिकण्यासाठी उद्युक्त व्हावेत अशी नव्या पुस्तकांची रचना आहे. मात्र, ऑनलाइन वर्ग घेताना अनेक संकल्पना विद्यार्थ्यांपर्यंत कशा पोहोचवाव्यात याबाबत अडचण येते. विशेषत: विज्ञान विषयांमध्ये विद्यार्थी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातूनही अनेक संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे शिकतात. परंतु सध्या प्रात्यक्षिके घेता येत नाहीत. त्यामुळे प्रशिक्षण लवकर आणि सविस्तर होणे आवश्यक होते. मात्र, विभागाने एका विषयाचे प्रशिक्षण अडीच तासांत उरकले आहे, असे एका शिक्षकांनी सांगितले.

‘बारावीचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. शिक्षकांची गुगल अर्जाच्या माध्यमातून नोंदणी करून घेण्यात आली आहे. परंतु कोणत्याही कारणासाठी प्रशिक्षण घेता येणार नाही, अशा शिक्षकांसाठी वेगळी काही व्यवस्था करता येईल का याची चाचपणी करण्यात येत आहे.’

–  डॉ. शकुंतला काळे, संचालक, राज्यमंडळ