आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने राज्यव्यापी पक्षबांधणीला प्राधान्य दिले आहे. या बांधणीची वीण अधिक धट्ट करण्यासाठी तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने केलेल्या असंख्य घोटाळ्यांचा पंचनामा करण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या ५ फेब्रुवारीपासून महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. कोल्हापूर येथे राज यांची पहिली जाहीर सभा होणार असून पक्षाच्या वर्धापनदिनापर्यंत म्हणजे ९ मार्चपर्यंत हा दौरा सुरू राहणार आहे.
या राज्यव्यापी दौऱ्यात राज पक्षपदाधिकाऱ्यांच्या बैठका आणि जाहीर सभा घेणार आहेत. या दौऱ्याच्या वेळी जिल्ह्य़ातील विविध क्षेत्रांतील मन्यवरांच्या भेटीगाठी घेऊन जिल्ह्य़ांच्या समस्याही ते समजून घेणार असल्याचे मनसेच्या सूत्रांनी सांगितले. या दौऱ्याच्या तयारीसाठी गुरुवारी मनसेच्या मुख्यालयात राजगड येथे सर्व संपर्क अध्यक्ष व आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे कायम कोल्हापूर येथील महालक्ष्मीचे दर्शन घेऊन दौऱ्याला सुरुवात करीत. त्याचप्रमाणे राज यांचाही राज्यव्यापी दौरा कोल्हापूर येथून सुरू होणार आहे.