२५० पैकी २१८आगार पूर्णपणे बंद;१६ गाडय़ांचे नुकसान

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी पुकारलेल्या बंदमुळे राज्यातील एसटी सेवा पूर्णपणे ठप्प झाली. २५० आगारांपैकी २१८ आगारातून एसटी गाडय़ा बाहेरच पडल्या नाहीत. त्यामुळे गाडय़ा पकडण्यासाठी आलेल्या प्रवाशांचे हाल झाले. बंद शांततेच्या मार्गाने झाला पाहिजे, अशी आचारसंहिता मराठा क्रांती मोर्चाकडून लागू केल्यानंतरही काही ठिकाणी हिंसक वळण लागले व राज्यात एसटीच्या १६ बस गाडय़ांची तोडफोड करण्यात आली.

९ ऑगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यामुळे एसटी महामंडळाने खबरदारीचे उपाय म्हणून राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना एसटी बस गाडय़ा चालविण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. बस गाडय़ांना जाळ्या बसवण्यात याव्या, आवश्यक असेल तरच बस सेवा चालवण्यात यावी अशा अनेक सूचनांचा समावेश होता. मात्र एसटीचे नुकसान होऊ नये यासाठी काही विभाग नियंत्रकांनी बस गाडय़ा न चालविण्याचाच निर्णय घेतला. बंद जरी असला तरी एसटी गाडय़ा धावणार आहेत की नाही याची कल्पना प्रवाशांना महामंडळाकडून देण्यात आली नव्हती. त्यामुळे आगार व स्थानकात एसटी पकडण्यासाठी आलेल्या प्रवाशांना तासंतास ताटकळ राहावे लागले. बस गाडय़ा कधी सुरू होणार याची विचारणा करणाऱ्या प्रवाशांना सायंकाळनंतर सुरू होण्याची माहीती दिली जात होती. परिणामी प्रवाशांकडून वाहतुकीसाठी अन्य पर्याय शोधला जात होता. बंदमुळे काही आगारात तर प्रवासी फिरकलेच नाहीत. मुंबईतील परळ, कुर्ला नेहरु नगर, मुंबई सेन्ट्रल, पनवेलसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, नाशिक भागात तर एसटी सेवा पूर्णपणे बंदच होत्या. विदर्भात ५० टक्के वाहतूक सुरू होती. बंद शांततेच्या मार्गाने करण्यात यावा. कोणत्याही शासकीय व खासगी मालमत्तेची तोडफोड अथवा मोडतोड करु नये, अशी आचारसंहिता मराठा क्रांती मोर्चाने लागू करुनही राज्यातील १६ एसटी बस गाडय़ांची तोडफोड आंदोलकांकडून करण्यात आली. यामध्ये नाशिकमध्ये पाच, औरंगाबादमध्ये ११ व नागपूरमधील एका बसचा समावेश आहे. १८ जुलैपासून ते आतापर्यंत झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनात ५४२ एसटी बस गाडय़ांचे नुकसान झाले आहे. एसटी बस न धावल्याने  साधारण २० कोटी रुपयांचा महसुल बुडाला.

उपनगरी गाडय़ांना गर्दी कमी

बंदमध्ये आंदोलनकर्ते रेल रोकोही करु शकतात, अशी शक्यता असल्याने रेल्वु सुरक्षा दल व लोहमार्ग पोलिसांनकडून  सर्व स्थानकांत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी झालेल्या मराठा मोर्चा आंदोलनात ठाणे, मानखुर्द, जोगेश्वरी येथे लोकल गाडय़ा अडवण्याचे प्रकार झाले होते. यावेळी असा प्रकार होऊ नये यासाठी पश्चिम व मध्य रेल्वेतील स्थानकांत मोठय़ा प्रमाणात सुरक्षा दलाचे जवान व लोहमार्ग पोलिसांनीही पोलीस फौजफाटा तैनात केला होता. सरकारी कर्मचाऱ्यांचा सुरू असलेला संप व मराठा आंदोलकांनी दिलेली बंदची हाक यामुळे गुरुवारी लोकल गाडय़ांना नेहमीपेक्षा गर्दी कमी होती. नेहमी धक्काबुकीतून होणारा प्रवास गुरूवारी सुकर होत होता.

बेस्ट बस अन्य मार्गाने

गेल्या आंदोलनात २५ बेस्ट बस गाडय़ांचे नुकसान झाले होते. मात्र गुरुवारच्या आंदोलनात बस सेवा सुरळीत होती. घाटकोपर पश्चिमेकडील आर.बी.कदम मार्ग, बर्वे नगर, भाईंदर पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर, चुनाभट्टी रेल्वे स्थानकाबाहेर सुरू असलेल्या आंदोलनामुळे बेस्टच्या नऊ बस गाडय़ांचे मार्ग बदलण्यात आले.