नव्या जमान्यात ‘दिसते ते खपते’ या तत्त्वाचा बोलबाला असून एखादी वस्तू ‘दिसण्या’साठी विपणन अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. थोडय़ा उशिराने का होईना, पण एसटी महामंडळाला ही गोष्ट लक्षात आली असून महामंडळाने स्थापन केलेला विपणन विभाग सक्रीय झाला आहे. या विभागाने एसटी थेट मध्य रेल्वेच्या मुख्यालयात पोहोचवली असून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये जाहिरातीचा भलामोठा फलक लावला आहे. सध्या उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या दोन्ही गाडय़ांच्या प्रवाशांना स्थानकाबाहेर पडताना एसटीची ही जाहिरात आकर्षित करत आहे. आजवर पहिल्यांदाच एसटीने मुंबई छत्रपती  शिवाजी टर्मिनस येथे जाहिरात केली आहे.
एसटीचे प्रवासी भारमान ६० टक्क्यांपेक्षा कमी झाले आहे. एसटीच्या बसगाडय़ा सध्या ४० टक्के रिकाम्या असल्याने एसटीला तोटा सहन करावा लागत आहे. ही तूट भरून काढण्यासाठी एसटी प्रवासी भारमान वाढवण्याचे विविध मार्ग अवलंबत आहे. त्यासाठी चालक-वाहक यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र तेवढय़ावरच न थांबता एसटीने काही महिन्यांपूर्वी विपणन विभाग स्थापन करून त्या विभागासाठी प्राथमिक स्वरूपात तीन कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या विपणन विभागाने एसटीच्या विविध योजना, एसटीची सेवा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध क्लृप्त्या शोधून काढल्या आहेत. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे जास्तीत जास्त लोक उतरतात. अनेकदा रेल्वेगाडय़ांची आरक्षणे फुल्ल असतात. रेल्वेलाही पर्याय म्हणून एसटीकडे पाहिले जाऊ शकते, हे या लोकांना समजावे आणि एसटीच्या सेवा लोकांपर्यंत पोहोचवाव्यात या दुहेरी उद्देशाने मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे प्लॅटफॉर्म क्रमांक सात व आठच्या येथून बाहेर पडण्याच्या ठिकाणी एसटीची ५० फूट बाय ९ फुट जाहिरात लावण्याचे आम्ही ठरवले, असे विपणन विभागाचे उप महाव्यवस्थापक कॅप्टन विनोद रत्नपारखी यांनी सांगितले.
*  महाराष्ट्रातील महत्त्वाच्या स्थानकांवर यापुढे एसटीच्या परिवर्तन या सेवेची जाहिरात करण्यात येणार आहे.
*  एसटीच्या सर्व बसगाडय़ांवर विविध सुविधांची माहिती देण्यात येणार आहे.
*  ‘बांधा-वापरा-हस्तांतरित करा’ या तत्त्वावर बांधलेल्या एसटी स्थानकांमधील सोयी,वक्तशीर सेवा यांची माहिती प्रवाशांना देऊन प्रवाशांना प्रभावित करण्याचा एसटी
महामंडळाचा प्रयत्न आहे
*  त्यासाठी एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी विपणन विभागाला महत्त्व देऊन तीन कोटी रुपयांचा तातडीचा निधी उपलब्ध करून दिला
आहे.