स्थानिक संस्था कराला पर्याय सुचवण्यासाठी वा सध्याच्या करात काही सुधारणा सुचवण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्याचे आश्वासन देऊनही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केवळ तोंडाला पाने पुसल्याची टीका करत व्यापाऱ्यांनी सोमवारपासून दोन दिवसांचा राज्यव्यापी बंद पुकारला आहे. त्यामुळे आजपासून दुकाने-व्यापार बंद राहण्याची शक्यता आहे.
स्थानिक संस्था कराच्या अंमलबजावणीला व्यापारी संघटनांचा विरोध आहे. याविरोधात आंदोलन केल्यानंतर मुख्यमंत्री चव्हाण यांनी याप्रश्नी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी समिती नेमण्याची ग्वाही दिली, पण प्रत्यक्षात समिती नेमली गेली नाही. याचा निषेध करण्यासाठी सोमवारी विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होण्याचा मुहूर्त साधत व्यापारी संघटनांनी दोन दिवसीय बंद पुकारला आहे. त्यातून राज्यातील व्यापार उदीम बंद ठेवत सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हा बंद यशस्वी करण्याची हाक ‘फेडरेशन ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र’ने राज्यभरातील सर्व जिल्’ाांतील व्यापारी संघटनांना दिली आहे.