संदीप आचार्य

राज्यातील ७० हजार रुग्ण संख्या एप्रिलअखेरीस ९९ हजारांपर्यंत वाढू शकते, असा इशारा केंद्र सरकारने दिला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने २५ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन आयात करण्याबरोबर १३२ ऑक्सिजन प्लांट (पीएसए) उभारणे तसेच ‘ऑक्सिजन कॉन्सट्रेटर’ आणि टँकर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दहा लाख रेमडेसिविरची खरेदी करण्यात येणार असून यासाठी ७४३ कोटी ७२ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

राज्यात १२०० मेट्रिक टन प्राणवायूचे उत्पादन होत असले तरी सध्या करोना रुग्णांसाठी रोज १५५० मेट्रिक टन प्राणवायू लागत असून ४०० मेट्रिक टन प्राणवायू अन्य राज्यांतून खरेदी करण्यात येतो. त्या राज्यांमध्येही रुग्णसंख्या वाढत असल्याने महाराष्ट्राला आगामी काळात या राज्यांकडून कदाचित प्राणवायूचा पुरवठा केला जाणार नाही. हे लक्षात घेऊन अतिरिक्त प्राणवायू खाटा निर्माण कराव्या लागणार आहेत. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी प्राणवायू आयात करण्याबरोबरच नवीन ऑक्सिजन प्लांट, रुग्णाच्या खाटेशेजारी ‘ऑक्सिजन कॉन्सट्रेटर’ तसेच ऑक्सिजन साठवणूक आणि वाहतुकीसाठी टँकर खरेदीची योजना आखली आहे. याशिवाय रेमडेसिविरचा तुटवडा व गरज लक्षात घेऊन दहा लाख रेमडेसिविर खरेदीचा तातडीचा प्रस्ताव तयार करून ‘राज्य उच्चाधिकार समिती’कडे मंजुरीसाठी पाठवला आहे.

२४ एप्रिल रोजी आरोग्य विभागाने सादर केलेल्या या प्रस्तावात रोज ५०० मेट्रिक टन याप्रमाणे २५ हजार मेट्रिक टन प्राणवायू आयात करण्याची परवानगी मागितली असून यासाठी अंदाजे शंभर कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. प्राणवायू आयात करण्यासंदर्भात गेल्या आठवड्यात मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे संबंधितांची एक बैठकही झाली होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकार परदेशातून ऑक्सिजन आयात करील, असे जाहीर केल्यामुळे याबाबतचा निर्णय घेण्यात आला नव्हता. दोन दिवसांपूर्वी निती आयोगाने तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील विविध राज्यांमध्ये ३० एप्रिलअखेरीस किती रुग्ण वाढतील व त्यासाठी साधारण, अतिदक्षता व प्राणवायू असलेल्या किती खाटा लागतील याचा आढावा घेऊन त्याबाबत राज्यांना तयारी करण्याच्या सूचना दिल्या.

* केंद्र सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यात ३० एप्रिलअखेरीस ९९ हजार ६६५ रुग्ण होण्याची शक्यता असून १६ हजार ६१ प्राणवायू खाटा विलगीकरण कक्षात कमी पडतील, तर २८७७ अतिदक्षता आणि १४५० व्हेंटिलेटर खाटा उपलब्ध असाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

* एकूण १३२ रुग्णालयांत १३२ प्रेशर स्विंग अ‍ॅडसॉपर्शन प्लांट (पीएसए) उभारण्यात येणार असून त्यासाठी दोनशे कोटी ८० लाख खर्च होणार आहे. यात प्रतिमिनिट ६०० ते ३५०० लिटर ऑक्सिजन तयार होणार आहे.

* ही योजना आरोग्य विभागाच्या २३ जिल्हा, आठ सामान्य आणि ९१ उपजिल्हा तसेच दहा महापालिका रुग्णालयात राबवली जाणार आहे. याशिवाय रुग्णाच्या खाटेशेजारी वापरण्यासाठी ४० हजार ७०१ ऑक्सिजन कॉन्सट्रेटर खरेदी केले जाणार आहेत.

* या योजनेसाठी २७२ कोटी १२ लाख रुपये खर्च येणार असून ठाणे, नाशिक, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर व नागपूरसाठी अंदाजे ४० लाख रुपये किमतीचे २१ आयएसओ टँकर खरेदी केले जाणार आहेत.