मुंबई : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक पुस्तकाचे गाव असायला हवे. त्यासाठी पुढील मराठी भाषा गौरव दिनापूर्वी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तकांचे गाव असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केली. शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे  आयोजित पुरस्कार प्रदान सोहळ्यात ठाकरे बोलत होते. यावेळी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.

विविध साहित्यप्रकारांची सुमारे ३५ हजार पुस्तके असणारे भिलार हे भारतातील पहिले पुस्तकांचे गाव आहे. राज्य मराठी विकास संस्थेकडून ही योजना ‘पुस्तकांचं गाव विस्तार योजना : अक्षरयात्रा’ या नावाने विस्तारण्यात येत आहे. जगभरातील मराठी कुटुंबांना एकत्र आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय मंच तयार करण्यात येणार असून आंतरराष्ट्रीय भाषा संवर्धन केंद्रांचे जाळे तयार करण्यात येत असल्याची माहितीही देसाई यांनी दिली.  या मंचातर्फे  चलचित्र, निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा कालावधी १० मार्च ते १० एप्रिलपर्यंत असून स्पर्धेचा निकाल महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे या दिवशी जाहीर करण्यात येईल.

ऐरोली येथे  मराठी भाषा उपकेंद्र

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या तांत्रिक सहकार्याने ऐरोली (नवी मुंबई) येथे मराठी भाषा उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. या उपकेंद्रात अ‍ॅम्प्फिथिएटर, बालोद्यान, आनंदयात्रा, उपाहारगृह, ग्रंथालय, प्रदर्शनकक्ष, परीक्षाकेंद्र, वातानुकूलित प्रेक्षागृह असेल.