डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीच्या निमित्ताने न्यूयॉर्क येथे त्यांचा अर्धपुतळा बसविण्यात आला असून हा पुतळा मुंबईतील (कांदिवली) शिल्पकार चंद्रजित यादव यांनी अवघ्या १२ दिवसांत घडविला आहे. सव्वातीन फुटाचा हा अर्धपुतळा पूर्णपणे कांस्य धातूत असून तो ऑक्सडाईज आहे. गुरुवारी या पुतळ्याचे न्यूयॉर्कमध्ये अनावरण झाले.
सांगली जिल्ह्य़ातील वीटा नगर येथे १० तर, औरंगाबाद विद्यापीठात १२ फुटाचा डॉ. आंबेडकर यांचा पुतळा या अगोदर यादव यांनी घडविला आहे. सध्या ते लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रविद्यापीठात बसविण्यात येणाऱ्या १४ फूट उंचीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर काम करत आहेत. न्यूयॉर्क येथे डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्ताने कल्पना सरोज फाऊंडेशनतर्फे हा पुतळा उभारण्याचे काम यादव यांच्याकडे सोपविण्यात आले. अवघ्या १२ ते १५ दिवसांत तो पुतळा पूर्ण करण्याचे आव्हान माझ्यापुढे होते. कांस्य धातूचा पुतळा तयार करण्यापूर्वी तीन दिवसांत सव्वातीन फुटाचा मातीपासूनचा अर्धपुतळा तयार केला. त्याला संबंधितांकडून मंजुरी मिळाल्यानंतर धातूचा पुतळा तयार करण्याच्या कामाला सुरुवात केली. मोल्ड, फायबर कास्टिंग, फॉण्ड्री, प्रेस कास्टिंग आदी तांत्रिक प्रक्रिया सहकाऱ्यांच्या मदतीने पूर्ण करून अवघ्या बारा दिवसांत हा अर्धपुतळा तयार झाला असल्याची माहिती यादव यांनी ‘लोकसत्ता मुंबई’ला दिली.

अर्धपुतळा तयार करण्यासाठी सुमारे सव्वातीन लाख रुपये इतका खर्च आला आहे. पुतळा घडविण्याचे काम मला मिळाले आणि माझ्या हातून ते चांगल्या प्रकारे पूर्ण झाले ही माझ्यासाठी भाग्याची बाब आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोटय़वधी लोकांना त्यांचे मूलभूत हक्क मिळवून दिले त्या महामानवाचे शिल्प माझ्या हातून घडले याचा आनंद आहे. ‘युनो’मध्ये एका भारतीय नेत्याचे शिल्प बसविले जात आहे हीसुद्धा गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे.
– चंद्रकांत यादव, शिल्पकार