संदीप आचार्य

मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक धर्मादाय रुग्णालये नियमानुसार गरीब रुग्णांना मोफत उपचार करण्याचे टाळतात. त्यास आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार तयार केलेल्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये आता एका ‘क्लिक’वर धर्मादाय रुग्णालयातील गरीबांसाठी राखीव असलेल्या खाटांची स्थिती कळणार आहे.

महाराष्ट्रात सुमारे ४३० धर्मादाय रुग्णालये आहेत. मुंबईत त्यांची संख्या ७४ आहेत. राज्यातील धर्मादाय रुग्णालयांमध्ये नियमानुसार गरीबांवर दहा टक्के खाटांच्या माध्यमातून उपचार करणे बंधनकारक आहे. यासाठी रुग्णालयाने आपल्या एकूण खाटांच्या दहा टक्के खाटा राखीव ठेवणे तसेच रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर ठळकपणे दारिद्रय़ रेषेखालील रुग्णांसाठी उपचाराच्या व्यवस्थेची माहिती प्रदर्शित करणे बंधनकारक आहे. धर्मादाय आयुक्तालयाने रुग्णालयाच्या नावाच्या पाटीवर ‘धर्मादाय’ हे लिहिणे बंधनकारकही केले होते. काही रुग्णालयांनी त्याचीही अंमलबजावणी केलेली नाही. या पार्श़्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री बनल्यानंतर धर्मादाय रुग्णालयात गरीबांसाठी १० टक्के राखीव खाटांचा पूर्णपणे वापर करण्यास प्राधान्य दिले होते. त्यानुसार धर्मादाय आयुक्तालयाने एक सॉफ्टवेअर तयार करून २०१५ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर मुंबईत महापालिकेच्या केईएम, शीव व नायर रुग्णालयात तसेच सेंट जॉर्ज व जे.जे. रुग्णालयात टीव्ही स्क्रि न बसवून त्यावर प्रत्येक धर्मादाय रुग्णालयात आजच्या दिवशी किती खाटा रिक्त आहेत याची आकडेवारी देण्यास सुरुवात केली. नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या या योजनेचा अलीकडेच आढावा घेऊन राज्यातील जिल्हा रुग्णालये व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये टीव्ही स्क्रिनद्वारे धर्मादाय रुग्णालयांची आधिकाधिक रुग्णांपर्यंत पोहोचविण्याची भूमिका मांडली. त्यानंतर गरीबांसाठीच्या १० टक्के रिकामी खाटांची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातील टिव्ही स्क्रीनवर उपलब्ध करून देण्याची व्यवस्था धर्मादाय आयुक्तालयाने केली आहे.

गरीब रुग्णांना दिलासा

मंत्रालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामध्येही राज्याच्या वेगवेगळ्या भागातून दररोज किमान सातशे ते आठशे लोक वैद्यकीय मदतीसाठी येत असतात. यातील अनेक रुग्णांना त्यांच्या भागातील धर्मादाय रुग्णालयात पाठविण्याचे काम करणे सहजसुलभ होणार असल्याचे मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षचे प्रमुख ओमप्रकाश शेटय़े यांनी सांगितले.