19 September 2020

News Flash

आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा; मुख्यमंत्र्यांचे मुंबईकरांना आवाहन

पुढील ४ तासांमध्ये पावसाचा जोर वाढणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (छायाचित्र सौजन्य- एएनआय)

मुंबईत पावसाचा जोर कायम असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. ‘अतिशय आवश्यक काम असेल, तरच लोकांनी घराबाहेर पडावे,’ असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. मुसळधार पावसामुळे मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील कर्मचाऱ्यांसाठी सुट्टी जाहीर केली. मुंबई पोलीस आणि पालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग हॉट लाईनवरुन संपर्कात असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियंत्रण कक्षाला भेट देऊन शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. ‘पावसामुळे कुठेही अडकले असल्यास मुंबई पोलिसांना फोन किंवा ट्विट करा. पोलीस तातडीने तुम्हाला मदत करतील,’ असे फडणवीस यांनी म्हटले. मुंबईकरांनी वाहतूक पोलिसांकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. सकाळपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. पावसाचा जोर वाढत गेल्याने मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले आहेत.

मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा ठप्प झाल्याने संपूर्ण शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेच्या सेवेवर परिणाम झाल्याने प्रवास कसा करायचा, असा प्रश्न मुंबईकरांसमोर निर्माण झाला आहे. सकाळी कार्यालयांमध्ये जाण्यासाठी निघालेल्या मुंबईकरांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. सकाळनंतर पावसाचा जोर वाढल्याने अनेक कार्यालयांनी कर्मचाऱ्यांना घरी जाण्यास सांगितले. मात्र रेल्वेसह रस्ते वाहतूकदेखील ठप्प झाल्याने मुंबईकरांची चिंता वाढली आहे.

मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचले असून त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे घराच्या दिशेने प्रवास करणारे अनेकजण रस्त्यातच अडकले आहेत. शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. संध्याकाळच्या वेळी समुद्राला भरती आल्याने साचलेल्या पाण्याचा निचरा होऊ शकलेला नाही. त्यामुळे पाणी ओसरायला बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. सकाळपासून सुरु झालेला जोरदार पाऊस मुंबईकरांना १२ वर्षांपूर्वीच्या २६ जुलैच्या पावसाची आठवण करुन देतो आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2017 6:09 pm

Web Title: stay at homes step out of homes only if necessary says cm devendra fadnavis after heavy rain in mumbai
Next Stories
1 मुंबईकरांनो, पावसात अडकला आहात? ‘या’ अपडेट नक्की वाचा
2 मुंबई पाऊस : गणेश मंडळांनी वीज कनेक्शन बंद करावेत; सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे आवाहन
3 Mumbai Rains Live Updates: मुसळधार पावसामुळे मुंबईकरांना ‘२६ जुलै’ची आठवण
Just Now!
X