बेस्ट प्रशासनाला समिती सदस्यांचा तिरकस सल्ला

ट्विटर, फेसबुकसारख्या समाजमाध्यमांना अक्षरश: आपल्या बोटांवर नाचवणाऱ्या तरुण पिढीच्या वेगाशी जुळवून घेणारे अधिकारी बेस्ट प्रशासनाकडे नाहीत. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने प्रवाशांशी संपर्क वाढवण्यासाठी थेट फेसबुक किंवा ट्विटरचा मार्ग अवलंबणे धोक्याचे ठरू शकते. या माध्यमांवर तुमच्या नकारात्मक बाजू उघडय़ा पाडल्या जातात. त्यामुळे लाज सांभाळायची असेल, तर समाजमाध्यमांपासून लांबच राहा, असा तिरकस सल्ला समिती सदस्यांनी बेस्ट प्रशासनाला दिला आहे.
बेस्टच्या २०१६-१७च्या अर्थसंकल्पात प्रवाशांच्या सुविधेसाठी बेस्टने फेसबुक आणि ट्विटर या समाजमाध्यामांद्वारे प्रवासी आणि वीजग्राहकांशी थेट संवाद साधण्याची तरतूद केली आहे. या तरतुदीबाबत बेस्ट समितीतील भाजप सदस्य आकाश पुरोहित आणि मनसेचे सदस्य केदार होंबाळकर यांनी प्रशासनाचा समाचार घेतला. बेस्टने मात्र समाजमाध्यमांवरील आपले खाते हाताळण्यासाठी एका खासगी कंपनीला कंत्राट दिले आहे.
प्रशासनाकडे दूरध्वनीद्वारे आलेल्या तक्रारींना उत्तर देताना अधिकाऱ्यांची तारांबळ उडते. बेस्टविरोधातील तक्रारी आल्यास त्याला उत्तर देण्यास प्रशासन सक्षम आहे का, असा प्रश्न पुरोहित यांनी विचारला.